आभासी बैठकीत अधिका-यांना दिले निर्देश...
बल्लारपुर (का.प्र.) - आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज आभासी बैठकीत चंद्रपूर-मुल व चंद्रपूर-कोठारी या रस्त्यांसंदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व भाजपाचे पदाधिकारी यांच्यासोबत आढावा घेतला. यावेळी चंद्रपूर-मुल रस्त्यावर अनेक कामे अजुनही पूर्ण झाली नाहीत याकडे पदाधिका-यांनी लक्ष वेधले. ज्यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर शहरातील रस्त्यांवरील विज व्यवस्था, गट्टू लावणे, सावरकर चौकातील सौंदर्यीकरण या प्रमुख मुद्दयांचा समावेश होता. यापैकी सावरकर चौकातील सौंदर्यीकरण १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करून त्यांचे उद्घाटन करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले. चंद्रपूर शहराबाहेर मुलपर्यंत अनेक ठिकाणी नाल्यांची आवश्यकता आहे, परंतु वनविभाग त्याची परवानगी देत नाही असे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांनी सांगीतले. त्यावर निर्देश देताना आ. मुनगंटीवार यांनी कार्यकारी अभियंता व पदाधिका-यांना ताबडतोब वनअधिका-यांना भेटून यासंदर्भातील अडचणी दूर करण्यास सांगीतले. चंद्रपूर-मुल रस्त्यावरील मच्छीनाला पुल अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे पदाधिका-यांनी निदर्शनास आणून दिले. यावर त्याठिकाणी सुध्दा अधिका-यांनी व पदाधिका-यांनी एकत्रीत भेट द्यावी व उपाययोजना करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.
कोठारी गावात रस्ता दुभाजक, विद्युत पथदिवे, दोन्ही बाजूने नाले व पेव्हर ब्लॉक बांधण्यासाठी साडेपांच कोटी रूपयांचा प्रस्ताव वरीष्ठ अधिका-यांकडे पाठविल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगीतले. त्यावर त्या अधिका-याशी या कामाच्या पाठपुराव्याची जबाबदारी पदाधिका-यांकडे यावेळी आ. मुनगंटीवार यांनी दिली. एकंदरीत चंद्रपूर-मुल रस्त्याच्या कामाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. या बैठकीला भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. मिश्रा, उपकार्यकारी अभियंता श्री. बोबडे, परिवहन अधिकारी श्री. मोरे, माजी महापौर अंजली घोटेकर, महानगर उपाध्यक्ष रामपाल सिंह, माजी जि.प. सदस्य गौतम निमगडे व शासकीय अधिकारी उपस्थित होते.