रब्‍बी धान खरेदीसाठी राज्‍य शासनाने दिली मुदतवाढ..!

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे फलीत...

बल्लारपुर (का.प्र.) - पणन हंगाम २०२१-२२ (रब्‍बी) मध्‍ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी १५ जुलै २०२२ पर्यंत पुर्ण करण्‍याचे निर्देश अभिकर्ता संस्‍थांना देण्‍यात आले होते मात्र सद्यःस्थितीत अतिवृष्‍टीमुळे धान खरेदी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्‍यामुळे धान खरेदीची मुदत वाढविण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांकडे केली होती. त्‍याअनुषंगाने अन्‍न व नागरी पुरवठा विभागाने दिनांक १५ जुलै २०२२ रोजी धान खरेदीला मुदतवाढ दिली आहे.अन्‍न व नागरी पुरवठा विभागाच्‍या दिनांक ३ जुलै २०२२ च्‍या पत्रान्‍वये रब्‍बी धान खरेदी करण्‍याकरिता केंद्र शासनाने दिलेल्‍या मंजूरीनुसार धान खरेदी करण्‍याकरिता म.रा. सहकारी आदिवासी विकास महामंडळ व महाराष्‍ट्र राज्‍य को-ऑपरेटीव्‍ह मार्केटींग फेडरेशन मुंबई यांना दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत मुदत दिली होती. राज्‍यात विशेषतः धान उत्‍पादक जिल्‍हयांमध्‍ये सध्‍या मोठया प्रमाणावर अतिवृष्‍टी व संततधार पाऊस सुरू असल्‍याने धान खरेदीला त्‍याचा फटका बसला आहे. ही बाब लक्षात घेता धान खरेदीला मुदतवाढ देण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांकडे केली होती. त्‍यानुसार केंद्र शासनाने दिलेल्‍या उदि्दष्‍टापैकी शिल्‍लक राहिलेल्‍या धानाची खरेदी करण्‍याकरिता दिनांक २२ जुलै २०२२ पर्यंत अभिकर्ता संस्‍थांना रब्‍बी हंगाम सन २०२१-२२ करिता दिलेले धान खरेदीचे उदि्दष्‍ट पूर्ण होईपर्यंत यापैकी जे प्रथम होईल तोपर्यंत मुदतवाढ देण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. सदर मुदतीत धान खरेदी पूर्ण करण्‍याची जबाबदारी दोन्‍ही अभिकर्ता संस्‍थांची राहील असेही शासनाने स्‍पष्‍ट केले आहे. या निर्णयामुळे धान उत्‍पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.