आनंद शिंदे (बाबा) - बऱ्याच लोकांना वाटते की बॉयकॉट ट्रेंडमुळे लोक सिनेमाला जात नाहीयेत आणि थिएटर ओस पडत आहेत. पण सत्य तसे नाहीये. बॉयकॉट ही नकारात्मक मागणी आहे, जीला कुठलाही ग्राहक स्वतःचा आनंद आणि फायदा सोडून भीक घालत नाही. उदाहरणार्थ चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला म्हणून सोशल मीडियामध्ये बोंब मारणारे लोकच स्वतः Oppo, Vivo वगैरे चिनी वापरत असतात, कारण त्या चिनी फोनमध्ये Apple, Samsung मधले फीचर्स निम्म्यापेक्षा कमी किंमतीत मिळतात.
दुसरे असे की प्रत्येक सिनेमाचा एक टार्गेट प्रेक्षकवर्ग (मार्केटिंगच्या भाषेत segment) असतो जो त्याचा ग्राहक असतो. तो कुणी कितीही बहिष्कार टाका म्हणले तरी योग्य पैशात उपलब्ध असेल तर तो सिनेमा पाहून येतो. बहिष्कार टाकणारे लोक अर्थातच मुळात ग्राहक नव्हते त्यामुळे त्यांच्या बहिष्काराचे खऱ्या ग्राहकाला सोयरसुतक नसते. उदाहरणार्थ, नरेंद्र मोदींची फिल्म मोदींवर टीका करणारे लोक तसेही पाहणार नव्हते, त्यामुळे काँग्रेसी त्याचे टार्गेट प्रेक्षक नव्हते. काँग्रेसच्या लोकांनी त्या फिल्मवर बहिष्कार टाकला असता, तरी त्याने मोदी समर्थकांना किंवा फिल्मला फरक पडला नसता.
मोदी समर्थकांनीसुद्धा मोदींची फिल्म पाहिली नाही कारण ती फिल्म बकवास होती (पैसा वसूल नव्हती). दुसऱ्या बाजूला "काश्मीर फाईल्स"चा काँग्रेसी लोकांनी कितीही विरोध केला तरी तेवढ्याच हिरीरीने मोदी समर्थकांनी ती फिल्म पाहिली आणि इतरांना दाखवली. मोदींच्या फिल्ममध्ये जी पैसा वसूल करणारी गोष्ट मोदी समर्थकांना मिळाली नाही ती काश्मीर फाईल् मध्ये मिळाली. परिणामी तो सिनेमा चांगला चांगला. थोडक्यात, बहिष्कार आणि समर्थन यांच्या पलीकडे जाऊन मनोरंजनाने पैसा वसूल होणार असेल तरच प्रेक्षक सिनेमा पाहतो हा जगाचा इतिहास आहे.
बॉयकॉट हा निष्प्राण प्रकार बाजूला ठेवून लोक थिएटरमध्ये न जाण्याची बरेच कारणे आहेत -
१) तिकीटाची किंमत - मल्टिप्लेक्समध्ये एक तिकीट 200-300 रुपयांना पडते. थोडक्यात 4 जणांचे कुटुंब जाणार असेल तर हजार रुपये तिकिटाचे. पॉपकॉर्नवर अजुन 400-500 रुपये. आणि नंतर बाहेर जेवण ओघाने आलेच, ज्यावर अजुन 2 हजार रुपये. थोडक्यात, कुटुंबाने सिनेमा पाहणे हे 3-4 हजार रुपयांचा event आहे, जोडीने पहायचा म्हणलं तरी 2 हजार गेलेच. एवढा पैसा उधळणारे खूप कमी लोक आहेत भारतात. मग थिएटर ओस पडणार ना?
२) OTT कडून स्पर्धा - जिथे थिएटर मध्ये फक्त एक सिनेमा पाहायला हजार रुपये जाणार तिथे OTT चे वर्षाचे सबस्क्रिप्शन हजार रुपयांना येते ज्यात अगणित सिनेमे पाहता येतात. तसाही थिएटरमध्ये आलेला सिनेमा महिन्यात OTT वरती येतो, मग जर सिनेमात काही जबरदस्त आकर्षण नसेल तर महिनाभर थांबून OTT वरती पाहणे हा सोपा ऑप्शन आहेच.
३) तंत्रज्ञान - साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी सामान्य भारतीय घरात २१ इंची CRT टेलिव्हिजन असायचे ज्याचे sound यथातथा आणि रेसोल्युशन 480p वगैरे होते. त्यामुळे तेव्हा चांगल्या, मोठ्या स्क्रीनवर सिनेमा पाहायला आणि जबर आवाज अनुभवायला थिएटर हे एकमात्र ऑप्शन होते. आज घरात 40-50 इंची टिव्ही नॉर्मल झाले, UHD/4K रेसॉल्युशन OTT द्यायला लागले, इंटरनेट अनलिमिटेड झाले, उच्च प्रतीच्या साऊंड सिस्टीम आल्या आणि घरोघरी AC आले. थिएटरमध्ये exclusively मिळणाऱ्या गोष्टी घरात आल्यावर कोण थिएटरमध्ये जाईल मग?
४) फॅनबेस कमी होणे - जेव्हा मनोरंजनाचे पर्याय कमी होते आणि इंडस्ट्री लहान होती त्या काळात हिरो-हिरोईन लोकांचे फॅनबेस मोठे होते. आणि हे फॅन्स सिनेमा थिएटरमध्ये बघण्यावर ठाम असत. दोन हीरोंच्या फॅन्समध्ये भांडणे वगैरे होत. जशी फिल्मइंडस्ट्री भराभर वाढली, दुसऱ्या भाषेतले सिनेमे पाहायला मिळायला लागले, मनोरंजनाची इतर साधने आली तसे फॅनबेस कमी झाले. सल्लूभाईचा सिनेमा ईदच्या दिवशी पाहणारा फॅन आता उत्तर भारतात ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात शिल्लक आहे, मेट्रोशहरात आणि मल्टिप्लेक्स मध्ये तो संपला. तुलनेने दक्षिणेच्या हिरो लोकांनी सामाजिक कार्य करत, ठोस आणि उघड राजकीय भूमिका घेत आपला फॅनबेस जपला आहे. म्हणूनच रजनीकांत, धनुष, विजय (दोन्ही) वगैरे लोकांचे सिनेमे आजही दक्षिणेत थिएटरमध्ये धुमाकूळ घालतात.थोडक्यात, बॉलिवुड किंवा मराठी सिनेमांच्या वेळी थिएटर ओस पडणे ह्याला असंख्य कारणे आहेत. इंडस्ट्रीला यातून बाहेर पडायला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत! - ✒ ..डॉ. विनय काटे..