किंग मेकरलाच 'माविआ' नेते विसरले!

मुंबई (जगदीश काशिकर) - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक करून आज चार आठवडे लोटले, मात्र शिवसेनेसह सर्वच महाविकास आघाडीतील नेते या विरोधात ब्र काढण्याचीही हिंमत करीत नाही, त्यामुळे राऊत एकाकी पडल्याचे चित्र दिसून येत आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी प्रथमच एक नवा प्रयोग करण्यात आला. भारतीय जनता पक्ष या आपल्या जुन्या मित्रपक्षाला शिवसेनेने झिडकारले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्ष या वैचारिक मतभेद असणाऱ्या पक्षांबरोबर शिवसेनेने जवळीक केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीचे मुख्यमंत्री होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि किंगमेकरच्या भूमिकेत होते शिवसेना नेते, खासदार संजय राऊत.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे सरकारी तपास यंत्रणांचा अत्यंत टोकाचा गैरवापर करत आहे, याबद्दल याच राऊत यांनी अनेक वेळेला लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनाही खडसावले होते. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्यावेळीही तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच विरोधकांना राऊत यांनी आपल्या अंगावर घेतले होते. इतकेच नव्हे तर नव्या शिंदे - फडणवीस सरकारमधील ४० बंडखोरांनाही त्यांनी शिंगावर घेतले होते.  

अभिनेत्री कंगना राणावत, पत्रकार अर्णब गोस्वामी असो की राणा दाम्पत्य अशा विरोधकांशी दोन हात करण्याची जबाबदारी असे, ती एकट्या संजय राऊतांवर. त्यावेळी सत्तेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष व तत्कालीन शिवसेनेतील एकनाथ शिंदेंसारखे मंत्री फक्त सत्तेची मलई ओरपत होते. अशा वेळी राऊतच एकाकी खिंड लढवत होते. महाविकास आघाडीतील बहुतेकांना कदाचित संजय राऊत आवडत नसावेत, पण त्यांच्यामुळे मिळालेली सत्ता त्यांना सोडवत नव्हती. या सत्तेचा उपभोग आघाडीतील सर्वच नेत्यांनी घेतला. आज हेच राऊत अटकेत आहे. मात्र राऊत यांच्याबाजूने काही बोलण्याची तसदीही आघाडीतील नेते घेत नाही. नुकतेच विधिमंडळ अधिवेशन संपले. सत्ताधारी व विरोधक असा सामनाही रंगला, मात्र या अधिवेशनात अनिल देशमुख, नवाब मलिक व संजय राऊत यांच्याविषयी कोणी ब्र देखील काढला नाही. राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले, पण पत्रकार परिषद घेतली नाही की, शिवसैनिकांना रस्त्यावर उतरण्याचा आदेश दिला नाही. 

राऊत यांचे कथित राजकीय गुरु व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची साधी भेटही घेतली नाही. काँग्रेसमधील नेत्यांना तर काहीच वाटत नाही. सत्ता असताना मलई खाणारे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मंत्री आजही मूग गिळून गप्प आहेत. ( तर महाभ्रष्ट विरोधी पक्षनेते अजित पवार हे नव्या सरकारचे 'मॅनेज्ड' विरोधी पक्षनेते आहेत, ते शुचिर्भूत होण्यासाठी केव्हाही भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करू शकतात.) अनिल देशमुख, नवाब मलिक व संजय राऊत हे धुतल्या तांदळासारखे आहेत, असे मुळीच नाही. मात्र या नेत्यांनी आघाडी सरकार वाचावे, टिकावे, म्हणून भाजपला शिंगावर घेतले होते, मात्र त्यांच्या नेत्यांना याबद्दल काहीच वाटत नाही, हे दुर्दैव. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक व शिवसेना नेते, खासदार संजय राऊत या तीनही नेत्यांनी एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबरच्या भ्रष्ट आमदारांसारखी गद्दारी केली असती व भाजपात प्रवेश केला असता, तर आज त्यांच्यावर ही पाळी आली नसती. आज हे तीनही नेते अडचणीत आहेत, अशा वेळेला महाविकास आघाडीमधील नेत्यांनी त्यांना साथ न दिल्यास ते भाजपच्या गळाला लागूही शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.