मुंबई (जगदीश काशिकर) - मुंबईत एका नव्या सेक्स स्कँडलने जन्म घेतला आहे. यामध्ये जवळपास ४० ते ५० हून अधिक कुटुंबातील महिलांचे शोषण झाले असल्याचा संशय आहे. या स्कॅण्डलमधील नराधमांनी या महिलांचे शेकडो अश्लील व्हिडीओ तयार केले आहेत. यापैकी ४० हून अधिक नग्न स्वरूपातील व्हिडिओ 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या ( एसआयटी ) हाती लागलेले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध असा रे रोड विभाग. या विभागात शिवडी पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस, बोट हार्ड रोड ( Boat Hard Road ), दारूखाना हा गजबजलेला भाग आहे. या भागात बहुतांशी झोपड्या आहेत. या झोपड्या प्लायवूड किंवा पत्र्याच्या बनवलेल्या आहेत.या परिसरात मुंबई महानगरपालिकेचे गटार साफ करण्याचे काम चालते. या कामासाठी साधारणतः २१ ते २८ या वयोगटातील कंत्राटी मुले हे काम करतात. या कामाची वेळ ही पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत असते.
या विभागातील १५ ते २० मुले ही दिवसभर या विभागात फिरायची. विशेषतः घरातील महिलांवर त्यांची पाळत असे. रात्री या कामगार मुलांना फार काम नसे. अशा वेळी ही मुले या झोपड्यांमध्ये असणारया फटी, छिद्रे यांचा शोध घ्यायची व तेथे मोबाईलमधील कॅमेराने शूटिंग करायचे. काही झोपड्यांमध्ये मोबाईलमधील कॅमेराने शिरकाव करायला जागा नसे. अशा वेळी ते रात्री छपरावर चढून तेथील छोट्या फटीमध्ये पेनमध्ये असणारा कॅमेरा लटकवायचे. तर काही वेळेला घरातील लोकांशी दुपारच्या वेळात जवळीक करायचे, त्यांना इलेक्ट्रिक वायर, केबल दुरुस्ती किंवा पाणी गळू नये म्हणून छोटीमोठी मदत करण्याच्या बहाण्याने घराच्या छपरावर चढायचे व त्या घरात पेनमधील कॅमेराने ( पेनकॅमेरा ) फिट करायचे.रात्रीच्या वेळी शूटिंग करायचे व त्याआधारे त्यांचे लैंगिक शोषण करायचे, पैसे मागायचे, ब्लॅकमेलिंग करायचे, असा आरोप या प्रकरणातील पीडित महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'स्प्राऊट्स'शी बोलताना केला आहे.
शिवडीमधील हे मोठे सेक्स स्कँडल आहे. हे सेक्स स्कँडल उघडकीस येण्याअगोदर या नराधमांनी किती महिलांची अब्रू लुटली असेल, किती कुटुंब उध्वस्त केलेली असतील, हे काळालाच ठाऊक.यातील एका प्रकरणात तर एका संशयित नराधमाने एका १२ वर्षीय मुलाचे कथित लैंगिक शोषण केले आहे, याविषयी पीडित मुलाच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जावून गुन्हा दाखल करण्यास सांगितले, मात्र त्यावरही अद्याप कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. या सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या महिलांनी २८ ऑगस्टपासून शिवडी पोलिसांकडे याविषयी एफआयआर दाखल करा व आरोपींना त्वरित अटक करा, असा तगादा लावला आहे. त्यासाठी लागणारे पुरावेही दिले आहेत. मात्र हे प्रकरण 'मॅनेज' करण्याकडे पोलिसांचा कल आहे, हे सपशेल दिसून येते. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही व 'एफआयआर'ही दाखल केलेला नाही, यावरुन पोलिसांच्या हेतूविषयी संशय निर्माण होतो. "यासंबंधीचे सर्व पुरावे आम्ही पीडित महिलांनी पोलिसांना सादर केले आहेत, मात्र पोलीस वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. या प्रकरणामुळे आमचे कौटुंबिक जीवन उध्वस्त झाले आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही आत्महत्या करु".