भद्रावती (ता.प्र.) - महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) चा वाटा मोठा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता.
एसएनडीटी महिला विद्यापीठाचे केंद्र चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे सुरू करण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाटील यांच्या निवासस्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात वरील निर्णय घेतला आहे.