भद्रावती शहरातील नागरिकांचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लक्ष ..!
भद्रावती (ता. प्र.) - येथील प्रसिद्ध बेकरी आणि ड्रायफूट्स दुकानात बुधवार दिनांक २ नोव्हेंबरला अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली असता शीतपेय, नमकीन आणि केळ्याचे चिप्स पॉकेट्स मुद्दत बाह्य आढळून आले.
सविस्तर घटना अशी कि, भद्रावती शहरातील एका नागरिकांनी बेकरी मधून फँटा शीतपेयाची बॉटल विकत घेतली होती. फँटा शीतपेय त्यांच्या मुलीने पीले होते. शीतपेयाच्या सेवनानंतर काही वेळाने त्यांच्या मुलीला उलटी व्हायला लागली. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला दवाखान्यात नेले असता तिला अन्न विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी फँटावरची वापराची तारीख पाहिली असता ती मुदत बाह्य झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी आम आदमी पार्टी भद्रावतीचे सचिव सुमित हस्तक यांच्याशी संपर्क साधला. सुमित हस्तक यांनी तुरंत अन्न व औषध प्रशासना चंद्रपूर त्यांच्याकडे इ-मेल व्दारे लिखित तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभाग चंद्रपूर चे अधिकारी सतकार यांनी भद्रावती येथील त्या बेकरीत तपासणी केली असता, त्यांना फँन्टा कंपनीचे शीतपेय, केळाच्या चिप्स आणि नमकीन पॉकेट्स हे कालबाह्य झाल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यानी संपूर्ण मुद्दत बाह्य साठा जप्त केला आहे आणि त्यांनी ग्वाही दिली की, अन्न सुरक्षा कायद्यान्वये बेकरी मालकावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.
शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दुकानदारावर अन्न व औषध प्रशासन विभाग काय कारवाई करेल याकडे नागरिकांचे लक्ष आहे. अशा अनेक ठिकाणी असलेल्या छोट्या शॉपिंग मॉल, बाजार यांच्याकडील अन्नपदार्थाची तपासणी होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा दुकानदारावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.