ग्राहक जागृती सप्ताहाची सूरूवात.!
भद्रावती (ता. प्र.) - २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो. शासनाकडुन ग्राहक दिवस साजरा करण्यासाठी विविध स्तरावर उपक्रम राबविले जातात. याचेच औचित्य साधुन यावर्षी ग्राहक पंचायत, भद्रावती ने ग्राहक जागृती सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. येणाऱ्या २४ डिसेंबर पर्यंत विविध आस्थापना, पेट्रोल पंप, मिठाई दुकाने, शॉपिंग मॉल, किराणा दुकान, हॉटेल, गॅस एजन्सी, महामंडळ यांची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार या तपासणी मोहिमे अंतर्गत ग्राहकांच्या हक्क, अधिकार, सुविधा, सुरक्षा याबाबत तपासणी होणार आहे.
दि. १८ डिसेंबरला याची सुरूवात झाली असुन आज भद्रावती शहरातील पाच पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात आली. तपासणी करतांना पेट्रोल पंपावर मोफत हवा भरण्याची सुविधा कर्मचा-यांसहीत असणे, टाॅयलेट आणि बाॅथरूमची सोय असणे, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाण्याची सुविधा असणे, आकस्मिक घटनेसाठी फोनची सुविधा, ग्राहकांना बिल देण्याची व्यवस्था, रोज बदलणारे दर फलक दर्शनी भागावर असणे आवश्यक आहे, प्राथमिक उपचारांची व्यवस्था, ग्राहकांना तक्रार करायची असल्यास तक्रार बुकची ठेवले आहे का? यासर्व बाबींची तपासणी करण्यात आली. शिवाय पेट्रोल आणि डिझेलचे एक लिटर आणि पाच लिटर च्या प्रमाणात तपासण्यात आले. तपासणी करण्यात आलेले पेट्रोल पंपमध्ये अली ब्रदर्स, वसुंधरा पेट्रोलियम, श्री वरदविनायक पेट्रोलियम, सरस्वती पेट्रोलियम सर्व्हिससेस, भद्रावती यांच्याकडे ग्राहकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे प्रमाणित करण्यात आले. काही पेट्रोल पंप मालकांना फ्री हवा आणि स्वच्छ टॉयलेट बाथरूम ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या. ग्राहक पंचायत भद्रावती कडुन ह्या सर्व पेट्रोल पंप मालकांचे अभिनंदन करण्यात आले. सोबत त्यांना प्रशंसा पत्र सुद्धा देण्यात आले. मात्र एक पेट्रोल पंप मालकाने ग्राहक पंचायतीच्या तपासणी मोहिमेला सहकार्य केले नाही. शिवाय ग्राहकांना नमुद केलेल्या सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांसोबत बोलण्याची पद्धत हि अत्यंत वाईट असल्याचे अनुभवास आले. त्यामुळे त्या पेट्रोल पंप विरूद्ध तहसीलदार भद्रावती, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर, पुरवठा आयुक्त, महाराष्ट्र राज्य आणि संबधित पेट्रोल पंप कंपनी याच्याकडे तक्रार करून लवकरात लवकर रितसर कारवाही करण्यासंदर्भात पत्र देणार असल्याचे ग्राहक पंचायत, भद्रावती च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणी मोहिम ग्राहक पंचायत, भद्रावती चे पदाधिकारी वामन नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे आणि प्रविण चिमुरकर यांच्या उपस्थित राबविण्यात आली.