मुंबई (जगदीश काशिकर) - महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुंबईतील चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा, बीआयटी चाळ (परेल) आणि सिद्धार्थ कॉलेज (फोर्ट) अशा महत्वाच्या ठिकाणांची बसने मोफत टूर आयोजित करण्यात आली आहे. आज या टूरच्या पाच बसेसना भाजपा विधानपरिषद गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला.
सकाळी 9.30 च्या सुमारास दादर येथील शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथून या मोफत बसफेरीला सुरुवात झाली. मोफत बसफेरीत मोठ्या संख्येने मुंबईकरांसह पर्यटक, बाबासाहेबांचे अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी आमदार दरेकर यांनी पर्यटकांशी संवादही साधला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन, आभार व्यक्त करतो. कारण अतिशय अभिनव अशी संकल्पना घेऊन जे या ठिकाणी मुंबई शहरात येतात, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात किंवा शहरात येतात त्यांच्यासाठी बाबासाहेबांच्या स्मृती असणारी पंचतीर्थ या मुंबईत आहेत. त्यात चैत्याभूमी आली, सिद्धार्थ कॉलेज, आंबेडकर कॉलेज, राजगृह, बीआयटी चाळ आहे. या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जायची संधी बाबासाहेबांच्या अनुयायांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेसाठी हा एक अभूतपूर्व असा उपक्रम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरु झाला आहे. या निमित्ताने नव्या पिढीलाही बाबासाहेबांची जी स्मृती स्थळे, बलस्थाने आहेत त्यांचे दर्शन व प्रेरणा घेता येईल, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.