भद्रावती (ता. प्र.) - कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शहरातील भांदक रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही हे थांबे अद्यापही पूर्ववत करण्यात आले नाही. यासाठी अनेकदा निवेदने देऊनही रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे थांबे त्वरित देण्यात यावे यासाठी झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवि शिंदे यांचे तर्फे पाठींबा देण्यात आला आहे.
भद्रावती हे औद्योगिक तथा ऐतिहासिक शहर आहे. शहरातील भांदक रेल्वे स्थानकावर व जवळच असलेल्या माजरी रेल्वे स्थानकावर इग्मोर एक्सप्रेस, दक्षिण एक्सप्रेस, तेलंगणा एक्सप्रेस, जयंती एक्सप्रेस, दादर लींक एक्सप्रेस, पटना एक्सप्रेस यासह अन्य रेल्वे गाड्यांचा थांबा होता. मात्र, कोरोना काळात हे थांबे रद्द करण्यात आले होते. ते अद्यापही बंदच असल्याने शहर तथा परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहे. यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आले. मात्र, रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने सदर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
रेल्वे थांबे त्वरित पूर्ववत करावे, अशी मागणी रवि शिंदे यांनीही केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची रेल्वे प्रशासनाने त्वरीत दखल घ्यावी, असेही रवि शिंदे म्हणाले आहेत.यावेळी ज्ञानेश्वर डुकरे वरोरा भद्रावती विधानसभा समन्वयक, विजय पारधे, राजेश आंबलवार, जितू मुरसकर, दिलीप पारखी, गोपाल सातपुते, संकेत खांगार, मनोज पापडे, रोशन केवट, तेजस कुंभारे, शुभम शिंदे, अक्षय बंडावार, सुनील पडोळे, कीर्ती पांडे, बोरसरे, आदी उपस्थित होते.