सातपाटीत आदर्श मच्छीमार मार्केट करणार - सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

केंद्रीय मंत्री परशोत्तम रूपाला यांच्या सागर परिक्रमा यात्रेच्या तृतीय चरणाचा महाराष्ट्रात प्रारंभ .. मच्छीमारांच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींचे योगदान मोठे : परषोत्तम रुपाला
पालघर (वि.प्र.) - सातपाटीतील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल. इकतेच नव्हे तर सातपाटी येथे आदर्श मच्छीमार्केट उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 
पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील सातपाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेच्या प्रांगणात केंद्रीय मत्स्यपालन व दुग्धविकास मंत्री परशोत्तम रूपाला यांनी प्रारंभ केलेल्या सागर परिक्रमेच्या तिसऱ्या चरणाच्या शुभारंभ समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मत्स्यपालन, दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला, सौ सरीता रुपाला, खासदार राजेंद्र गावित, आमदार मनीषा चौधरी, आमदार श्रीनिवास वनगा, माजी राज्यपाल राम नाईक, अनुराग कौशिक, मत्सव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, सरपंच सीमा भोईर, पंकज पाटील, पंकज कुमार, सी. सुवर्णा, नीरंजन दिवाकर यावेळी उपस्थित होते. 
आपल्या भाषणात मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या कार्याचा गौरव केला. सागर परिक्रमेच्या माध्यमातून रुपाला हे व्यापक कार्य करीत आहे. सागर परिक्रमेमुळे नीलक्रांतीला चालना मिळत आहे. या कार्याच्या संकल्पपूर्तीसाठी ते स्वत: भ्रमण करीत आहेत. मच्छीमारांच्या समस्या ऐकण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळही दिला आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारही सातपाटीतील मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही यावेळी मुनगंटीवार यांनी दिली.  
देशाला ७ हजार ५०० किलोमीटरची समुद्रीसीमा मिळाली आहे. त्या महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. या समुद्रकिनाऱ्यात ७२० किलोमीटरचा समावेश राज्याचा असल्याचे नमूद करीत मुनगंटीवार म्हणाले की, देशाला समुद्रसंपदा देण्यात महाराष्ट्रही मागे नाही. जल, कृषी आणि वन हे तीन विभाग असे आहेत जे लोकांचे पोटभरण्यासाठी उपयोगी ठरतात. मनुष्याचे पालनपोषणासाठी हे तीनही विभाग अविभाज्य घटक आहेत. मच्छीमारांचा अभिमानाने उल्लेख करताना मुनगंटीवार यांनी नमूद केले की, मच्छीमार महाराष्ट्राच्या सनातन संस्कृतीचे जतन करणारा वर्ग आहे. सातपाटीतील सीमांकन, जमिनीच्या मोजणीसाठी देखील राज्यस्तरावरून पाठपुरावा करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याची घोषणा करीत मुनगंटीवार यांनी सांगितले की, मच्छी वाळविण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्मचीही निर्मिती करण्यात येईल. वाढवन बंदराचा मुद्दाही योग्य पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. 
"सातपाटीतील समस्या सोडविणार" -
सातपाटीतील समस्या सोडविण्यावर राज्य सरकार भर देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मच्छीमारांना डिझेलच्या अनुदानासाठी यापुढे अनेक दिवस थांबावे लागणार नाही. वित्त विभागाच्या मदतीने या मच्छीमारांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कोणतेही अनुदान किंवा निधी थकला तर तो व्याजासह देता येईल का, याचा विचारही करण्यात येत आहे. यासंदर्भात सर्वसमावेशक विचारांती निर्णय घेण्यात येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

"मच्छीमारांच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींचे योगदान मोठे : परषोत्तम रुपाला"  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य व्यवसाय विभागाला पुनर्जीवन प्रदान करीत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आह़े, मच्छीमारांच्या विकसाकरिता व सागरी क्षेत्र संपन्न करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आह़े असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत जेवढा निधी मिळाला त्यापेक्षा किती तरी अधिक निधी श्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मत्स्यव्यवसाय वृद्धीसाठी उपलब्ध करून दिला आहे. पंतप्रधानांनी किसान क्रेडिटच्या माध्यमातून मच्छीमारांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचाही लाभ प्रत्येकाने घ्यावा. मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे काम करणार आहे. महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाची स्तुती करीत श्री रुपाला यांनी सातपाटीतील मच्छी मार्केट एखाद्या मॉलप्रमाणे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.