भद्रावतीत दिनांक 19 मार्चला सहावे स्मृतिगंध काव्यसंमेलन विदर्भातील दिग्गज कवींची उपस्थिती .!
स्व.विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन .!
भद्रावती (ता.प्र.) - स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने स्थानीक श्री मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह येथे रविवार दिनांक 19 मार्च 2023 ला सहावे स्मृतिगंध काव्यसंमेलन संपन्न होत आहे. नवोदीत व प्रथितयश काव्यप्रतिभेचा सन्मान आणि मराठी काव्य रसिकांच्या आस्वादकतेस प्रोत्साहन देण्यासाठी ह्या संमेलनाचे प्रयोजन आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा.गंगाधर मुटे आर्वी (वर्धा) यांचे अध्यक्षतेखाली प्रख्यात समिक्षक डॉ.तिर्थराज कापगते, नागपूर हे या नियोजीत संमेलनाचे सकाळी ठिक 10.30 वा. उद्घाटन करतील. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून ज्येष्ठ सहित्यिक आचार्य ना.गो.थुटे वरोरा, सुप्रसिद्ध् कादंबरीकार डॉ. अनंता सूर वणी, ज्येष्ठ पत्रकार राजेश मडावी सह संपादक लोकमत चंद्रपूर, ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते ॲड. भुपेंद्र रायपुरे भद्रावती, ईत्यादी मान्यवर उपस्थित राहतील. भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर या काव्यसंमेलनाचे निमित्ताने विशेषत्वाने उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश हटवार हे करणार आहेत.
स्मृतिगंध काव्य संमेलनाचे निमित्ताने आयोजीत एक दिवसीय भरगच्च काव्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न होत आहे. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात, निमंत्रीत कवींची गझल मैफिल हे या कवी संमेलनाचे खास वैशिष्ट असून, प्रख्यात गझलकार जयवंत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मैफिलीचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. विदर्भातील प्रतिभाशाली कवी व गझलकारांची उपस्थिती प्रामुख्याने संमेलनात राहणार आहे.
संमेलनाच्या चौथ्या सत्रात ज्येष्ठ कवी दिपक शिव यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन रंगणार आहे. खुल्या कवी संमेलनात देखील प्रतिथयश कवी व नवोदितांच्या काव्यमय जुगलबंदीचा लाभ काव्य रसिकांना होणार आहे. याचा लाभ नवोदित कवी यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा.
स्मृतिगंध काव्यसंमेलनाचे सदर आयोजन हे विदर्भस्तरीय असून, विदर्भातील प्रख्यात साहित्यिक व कवींचा मेळा या निमित्ताने भद्रावती नगरीमध्ये रंगणार आहे. मायबोली मराठी व मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या काव्यरसिकांनी तसेच नवोदितांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्मृतिगंध काव्य संमेलनाचे संयोजक प्रविण आडेकर यांनी केले आहे.