भद्रावतीत सहाव्या स्मृतीगंध कवी संमेलनाचे थाटात उदघाटन .!
भद्रावती (ता.प्र.) - “कवी हा द्रष्टा आहे. तो देवाचा लाडका आहे. जगाची वेदना संवेदना जागृत करण्याचे काम कवी करीत असतो. काव्य निर्माण करणे अवघड आहे, ते सर्वानाच जमत नाही. कोरोणा काळात संपुर्ण जग ठप्प झाल, पण कवी मात्र काव्य निर्मिती करीत राहीला. रसिक हा मुका कवी असतो आणि कवी हा बोलका रसिक असतो. त्यामुळे समाजाला कवींची फार गरज आहे”. असे मार्मिक प्रतिपादन प्रख्यात समीक्षक डॉ. तिर्थराज कापगते यांनी स्मृतिगंध काव्य संमेलनात बोलतांना केले. स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने दिनांक 19 मार्च ला आयोजीत सहाव्या विदर्भस्तरीय स्मृतिगंध काव्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटनपर मनोगत व्यक्त् करतांना ते बोलत होते. जागतिकीकरणाचा सर्वच क्षेत्रावर प्रभाव पडलेला असला तरीही कविता मात्र जिवंत राहीली आहे. जागतिकीकरणात मराठी भाषा निश्चितपणे टिकेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी काव्यमंचावर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर मुटे , वर्धा यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे वरोरा, प्रख्यात कांदबरीकार डॉ. अनंता सूर वणी, सामाजिक कार्यकर्ते ऍड. भुपेंद्र रायपुरे भद्रावती ईत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
या काव्य् संमेलनाच्या निमित्ताने अध्यक्षीय विचार मांडतांना संमेलनाध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले की, ’’स्वत:ची अभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी साहित्त्य असते. प्रेक्षकांच्या फर्माईशीनुसार ऍटम पेश करणे, असा साहित्याचा तमाशा होणे समाजाच्या आरोग्याला कधीही पुरक ठरणारे नाही. त्यामुळे सृजकांनी याची सामाजिक भान ठेऊन सामाजिक जाणीव स्विकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे.”
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये संमेलनाध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न झाले. विदर्भातील प्रतिभाशाली कवींनी आपल्या सादरीकरणाने या काव्य रसिकांची मने जिंकली. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ गझलकार राजेश देवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिगंध गझल मैफिल संपन्न झाली. याप्रसंगी राम रोगे, नांदाफाटा, सुरेश शेंडे गडचिरोली या मान्यवर गझलकारांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. मैफिलीमध्ये विदर्भातील प्रथीतयश गझलकारांचा समावेश होता. सर्वच गझलकारांच्या बहारदार सादरीकरणाने संमेलनात रंगत भरली. संमेलनाच्या चवथ्या सत्रामध्ये ज्येष्ठ कवी दिपक शिव आनंदवन यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन पार पडले. यावेळी काव्यमंचावर विवेक पत्तीवार चंद्रपूर, शंकर लोडे चंद्रपूर, निरज आत्राम वरोरा, माधव कौरासे भद्रावती या मान्यवर ज्येष्ठ कवींची प्रमुख उपस्थिती होती. खुल्या कवी संमेलनात देखील नवोदितांनी आपल्या काव्य प्रतिभेणे रसिकांची मने जिंकून घेतली.
उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन डॉ.ज्ञानेश हटवार यांनी केले. निमंत्रीतांच्या कवीसंमेलनात अभय दांडेकर हिंगणघाट, यांच्या सुत्रसंचलाने रंगत भरली तर सुनिल बावणे बल्लारपूर यांनी आपल्या बहारदार सुत्रसंचलनाने गझल मैफिल सजविली. आरती रोडे वरोरा यांच्या सुत्रसंचलनाने खुल्या कविसंमेलनाला चार चांद लावले. आभार डॉ. सुधीर मोते व प्रवीण आडेकर यांनी मानले.