भद्रावतीत वि.सा. संघातर्फे भावगीतांचा संगीतमय कार्यक्रम .!
भद्रावती (ता.प्र.) - गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावतीच्या वतीने हा गुढीपाडवा भद्रावतीकरांच्या जीवनात संगीतमय पहाट पाडवा ठरला हे विषेश. पंडित अजित कडकडे यांचे शिष्य अमित लांडगे यांचा हा सुश्राव्य भावगीत कार्यक्रम , "मंगल स्वरपहाट,मंगल गुढीपाडवा" भद्रावतीकरांना मंत्रमुग्ध करून गेला.
भद्रावती येथील विदर्भ साहित्य संघ च्या वतीने आज पहाड पाडव्याचे निमित्त साधून निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या पटांगणा सकाळी पाच वाजता पहाट पाडव्याच्या आयोजन करण्यात आले. सकाळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाची सुरुवात आर्ष चावरे या बाल कलाकाराने केली. ऋषिकेश ढोमणे यांनी यांनी सुद्धा आपली गायकी पेश केली. त्यानंतर गायन मंचावर पंडीत अजित कडकडे यांचे शिष्य अमित लांडगे यांनी चैत्र पहाट निमित्त सुमधुर भावगीतांचा नजराणा पेश केला. अमित लांडगे यांनी एकाहून एक अशा सरस गीतांनी सुरांची बरसात करत रसीक, श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या संगीतमय कार्यक्रमात गायक अमित लांडगे, ऋषिकेश ढोमणे, बाल गायक आर्च चावरे यांनी आपले गीत सादर करून रसीक श्रोत्यांना आपल्या तालासुराने रिझवीले. यांना साथ देण्यासाठी तबल्यावर आकाश निनावे, गणेश निनावे ह्या पीतापुत्रांनी साथ दिली. हार्मोनियम वादक अरविंद बटाले व मंजिरी वादक दिलीप झाडे यांनी साथ संगत दिली. भद्रावती रक्षक श्रोत्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहाटेतून उठून संगीतमय मैफिलीचा आनंद घेतला.
भद्रावतीकरांची चैत्र पहाट अर्थात गुढीपाडव्याची सुरवात ही संगीतमय सुश्राव्य गीतांनी झाल्याने एक वेगळ्याच चैतन्याची अनुभूती घेतली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एल एस लडके, वि.सा. संघाचे अध्यक्ष डॉ. सुधीर मोते, सचिव डॉ. ज्ञानेश हटवार, अनिल पिट्टलवार, प्रवीण आडेकर शालिक दानव व समस्त पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला भद्रावतीतील मान्यवर मंडळी मोठ्या संखेत उपस्थित होते.