विवेकानंद महाविद्यालयात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार .. गुरुकुंज मोझरी आश्रमाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांचाही गौरव केला .!
भद्रावती (ता.प्र.) - "आम्हाला कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ कामांच्या आणि मतदारांच्या भरोशावर शिक्षक आमदार या पदावर पोहोचलो. प्रामाणिकपणे कार्य केल्यास सेवेचे चांगले फळ मिळते याची प्रचिती आली. माझा विजय हा आपल्या सगळ्यांच्या एकजुटीचा विषय आहे. जरी मी शिक्षक आमदार असलो तरी मी शैक्षणिक क्षेत्रासोबतच शेतकऱ्यांच्या समस्यांवरही सभागृहात लढेल. जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहील" असे विचार नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचे सचिव अमन मोरेश्वरराव होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वामनराव चटप, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोकराव जिवतोडे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे, प्राचार्य डॉ नामदेव उमाटे प्रामुख्याने उपस्थित होते. महायोगी श्री अरविंद सभागृहात झालेल्या सत्काराला उत्तर देताना लक्ष्मणराव गमे यांनी सांगितले की, " राष्ट्रसंतांचा गुरुकुंज आश्रम हा लोकशाही मार्गाने काम करत असतो. तेथील स्वच्छ व सुंदर परिसर पाहायला आपण यावे. जवळपास ३५ वर्षानंतर चंद्रपूरला सर्वाधिकारी हा सन्मान मिळाला आहे. घर तिथे ग्रामगीता वाचक ही संकल्पना राबविणार आहोत. आपण सगळ्यांनी या कामात सहभागी व्हावे" असे आवाहन त्यांनी केले. यावेळी परिसरातील अनेक संस्थांनी सत्कारमूर्तींचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.ज्योती राखुंडे, प्रास्तविक प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे आभारप्रदर्शन प्रा. नरेंद्र लांबट यांनी केले. यावेळी भद्रावती परिसरातील अनेक सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .