शेगांव (वि.प्र.) - दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय पोथी वाचताना भक्तांना प्रश्न पडत असेल की, शेगावच्या या प्रत्यक्ष परब्रह्माने बुटींच्या वाड्यातून बाहेर पडताच नागपूर जवळच्या रामटेक येथे जाण्याचा मनोदय का व्यक्त केला असेल ? खऱ्या ईश्वरभक्तामुळे असंख्य जीवांचे कल्याण होते हे दर्शवणारा हा प्रसंग. प्रत्यक्ष सगुण परमात्मा आज एका सच्चा रामभक्ताची आस पूर्ण करायला आला होता. तो खरा श्रीरामभक्त म्हणजे शंकरबुवा.
ते अतिशय एकनिष्ठ श्रीराम भक्त होते. रामाचे सगुण दर्शन आपल्याला व्हावे, एवढीच त्यांना इच्छा होती. सन्यस्त जीवन जगणारे शंकरबुवा रामटेक क्षेत्री आले, कारण प्रत्यक्ष श्रीराम प्रभूंनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की, रामटेक क्षेत्री मी तुला सगुण दर्शन देईन. त्या रामरायाच्या स्वप्नदृष्टांतानुसार, ते रामटेक येथे येऊन रामनामाचे चिंतन करायला लागले. चिंतनासोबतच त्यांनी सेवेचे व्रत सुद्धा आरंभ केले, ते म्हणजे राम प्रभूंच्या मंदिराचा परिसर झाडून स्वच्छ ठेवणे. मंदिराच्या महाद्वाराच्या आतील आणि बाहेरचा परिसर झाडण्याची सेवा त्यांनी सुरू केली, जोडीला रामनाम जप सुरू होताच. माझा रामप्रभू मला येथे साक्षात सगुण दर्शन देऊन माझे जीवन कृतार्थ करेल हा एकच ध्यास त्यांच्या अंत:करणाला लागला होता. शंकरबुवा सामान्य व्यक्ती नव्हते. त्यांनी जी सेवा आरंभ केली, ती थोड्या कालावधीसाठी नव्हती. तर परमेश्वराचे सगुण दर्शन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही अविरत सेवा आणि भक्ती होती. सेवा ही भक्तीपूर्ण असणे, महत्त्वाचे आहे. या सेवेतून भक्ती वेगळी करता येत नाही. त्यांच्या सेवेमध्ये भक्ती ओसंडून वाहत असे.
पूर्ण बारा वर्षांच्या सेवा आणि भक्तीच्या फळाला त्या दिवशी अमृताचा दिन उगवला होता. रोजच्याप्रमाणे त्या दिवशीही शंकरबुवांनी रामरायाकडे प्रार्थना केली, "हे रामराया! तू माझा किती अंत पाहतोस ? आज तरी माझे नेत्र तुझ्या सगुण दर्शनाने तृप्त कर. मला केवळ तुझ्या प्रत्यक्ष सगुण दर्शनाची आस आहे. किती वर्ष लोटली, अजून तू का मला भेटत नाहीस ?" आता बारा वर्षे सुरू असलेली अंतरीची प्रार्थना भगवंताने ऐकली. त्यांची एका तपाची सेवा आणि भक्ती पाहून शेगावातील हा भगवंत शंकरबुवासारख्या श्रेष्ठ भक्ताच्या भेटीसाठी धावत आला.
गजानन महाराजांना घेऊन पालखी नागपूर येथून रामटेकच्या गडावर आली. तोच महाराज लगबगीने पालखीतून उतरले आणि त्यांच्या धावत चालण्याच्या शैलीने श्रीराम मंदिराच्या महाद्वाराकडे त्यांनी आगमन केले. महाराज महाद्वाराच्या आत प्रवेश करतात, तोच अंगण झाडण्याची सेवा करीत असलेल्या शंकर बुवांचे लक्ष समोर गेले. ते समोर बघतात तर त्यांचा रामराया महाद्वारातून आत प्रवेश करतो आहे, असे त्यांना दिसले. भरजरी पितांबर नेसलेला सुंदर सगुण सावळा रामराया, खांद्यावर दोन्ही भुजांवरून लांब शेला लोंबत आहे, जटा खांद्यावर रुळत आहेत आणि उजव्या हातात धनुष्य घेऊन रामराया लगबगीने महाद्वारातून आत प्रवेश करीत आहे. असे पाहताच शंकर बुवांनी आपल्या हातातील झाडू तेथेच टाकून ते आपल्या प्रभुकडे धावत निघाले आणि त्यांचा प्रभूसुद्धा त्याच भक्तभेटीच्या ओढीने भक्ताकडे येत होता.
शंकरबुवांनी भगवंताजवळ येताच आपला देह प्रभूच्या पायावर झोकून दिला. प्रभूच्या पावन चरणांवर डोके टेकवले. चरणांवर अश्रूंचा अभिषेक झाला. आज त्यांचा प्रभू त्यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष तेथे आला होता. प्रभुंच्या चरणांवरून त्यांचे अश्रू वाहू लागले. "प्रभू किती उशीर केलात ! आपण माझ्यासाठी का बरे इतके निष्ठूर झाला होता ?" आपल्या भक्ताची ती अवस्था जाणून महाराज म्हणाले, "अरे उठ ! तुझ्यासाठीच तर आलोय मी !" महाराजांनी शंकरबुवांना हात धरून उठवले आणि आपल्या हृदयाशी लावले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. आज रामप्रभूंनी शंकरबुवांना दर्शन देऊन आपल्या हृदयाशी लावून एक तपाची फलप्राप्ती दिली होती. ही लीला होते न होते, तोच सोबतची सर्व मंडळी तेथे येऊन ठेपली. शंकरबुवा पाहतात तर त्यांच्या रामरायाच्या जागी त्याच उंचीचे दिगंबर सावळे रूप. ना पितांबर, ना शेला, ना धनुष्य, डोक्यावर जटासुद्धा नाहीत. त्यांना सर्व रहस्य कळून चुकले. कारण ते सामान्य भक्त नव्हते. त्यांनी ओळखले की, माझा रामराया याच गजानन महाराज रूपात अवतार कार्य करीत आहे. ज्ञानी भक्ताला एक वेगळीच समज असते. त्या कारणाने येथे भ्रमाचा प्रश्न उरत नाही. शंका-कुशंकांची बाधा अशा भक्तास होत नाही. अशा प्रकारे सेवा हीच साधना करून शंकरबुवांनी भगवंत प्राप्त करून घेतला.
शंकरबुवा आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तांची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.