श्री.गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प पस्तिसावे - तुकाराम शेगोकार

शेगांव (वि.प्र.) - श्री गजानन महाराजांच्या सेवेत असलेल्या भक्तांपैकी तुकाराम शेगोकार हे शेगावातील रहिवासी. ते जातीने माळी होते. अतिशय भाविक मनाच्या शेगोकरांना साधुसंतांविषयी प्रेम होते. घरची परिस्थिती जेमतेमच होती. श्रमावर विश्वास व सन्नतीचे वर्तन असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. जीवन कष्टमय असले तरी आपले कर्म करून ते दररोज सायंकाळी महाराजांच्या सेवेत आपली हजेरी लावीत असत. महाराजांना चिलीम भरून द्यावी व दर्शन घेऊन संत सहवासातील शांतीचा आनंद घ्यावा असा त्यांचा नित्यनेम. तुकाराम शेगोकार यांनी संतसेवेचा वसा घेतला व इमानेइतबारे महाराजांची सेवा देखील केली. पण जे काही दैवात असते ते घडते. "जे जे असेल दैवात! तेथे श्रोते घडून येत!!" या शास्त्र वचनाप्रमाणे एकदा या गरीब भक्तावर एक दुर्दैवी प्रसंग ओढावला.
हिवाळ्याच्या दिवसात एकदा तुकाराम शेगोकार आपल्या शेतात सकाळी शेकोटीवर हात शेतीत बसले होते. इकडे एक शिकारी बंदुकीत छर्रा घालून सशाच्या शिकारीसाठी आला. सूर्य नुकताच उदयाला आला होता. अशा समयी तुकाराम जेथे शेकोटीवर शेकतच होते. त्यांच्या मागेच लपलेला एक पांढरा शुभ्र ससा त्या शिकार्‍याच्या दृष्टीस पडला. सशावर नेम धरून त्या शिकाऱ्याने आपल्या खांद्यावरील बंदुकीतून फैर झाडली. त्याच छऱ्याने ससा तर मेलाच पण शेकोटी जवळील तुकारामाच्या कानामागे एक मोठा छर्रा जोरदारपणे लागून त्याच्या मस्तकात शिरला. देवाने अवचितपणे येऊन घाला घालावा असाच हा प्रकार झाला.
कानामागून बंदुकीचा तो छर्रा मस्तकात शिरल्याने किती वेदना झाल्या असतील, याची कल्पना केलेलीच बरी. त्या असह्य वेदना कशा कमी होतील यासाठी जीव तळमळत असे. डॉक्टरांना दाखविले परंतु तो छर्रा काही केल्या निघेना. डॉक्टर सर्व उपाय करून थकले. शेवटी नवस-सायास देखील झाले. पण काहीही उपयोग झाला नाही. आरामही पडला नाही. त्या असह्य यातनांनी झोप लागत नव्हती. रात्रंदिवस सतत डोके दुखत होते. अशा अवस्थेतही त्याने दररोज मठात येऊन महाराजांची सेवा करणे व दर्शन घेणे हे सोडले नाही. एक दिवस त्यांना महाराजांच्या सेवकांपैकी एक जण म्हणाला ," डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूंच्या सेवेशिवाय दुसरा कोणताही उपाय या जगामध्ये उत्तम नाही. त्यांची कृपा झाली तर हा त्रास चुकेल. हा मठ झाडीत जा. त्यायोगे सेवाही घडेल पुण्यही लाभेल आणि कृपा झाली तर त्रासापासून मोकळा होशील."
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन हे उपयुक्त व कल्याणकारी कसे ठरते हे आपण आपल्या जीवनात नेहमी अनुभवतो. आज चांगला सल्ला देणाऱ्यांचा तुटवडा पडला की काय असे वाटते. पण तसे नाही. सज्जन व संतजन हे या भूतलावरून नष्ट होऊच शकत नाही. तसे जर झाले तर समोर जग नष्ट व्हायला, कलह व्हायला वेळ लागणार नाही. संत कृपा झाली की सज्जनांचाही सहवास घडू लागतो. ज्याला ब्रम्हाचा पूर्ण साक्षात्कार झाला त्याला संत म्हणतात.
शांती व महानता ज्यांच्यामध्ये वास करते, जे केवळ लोकहितासाठी विचरण करतात, ते जिथे जातील, तिथे वसंत ऋतु सारखे वातावरण निर्माण करतात. जे भवसागरातून मुक्त झाले आहेत ते इतरजनांना मनाशी कोणताही हेतू न ठेवता भवसागरातून पार करतात. अशांना संत म्हणावे. संत सेवा व सहवास घडणे म्हणजे महत् भाग्याचे लक्षण आहे. मात्र तो वर सांगितल्याप्रमाणे खरा संत असणे जरुरी आहे. संत ओळखण्यास फसगत होण्याची दाट शक्यता नाकारता येणे शक्य नाही. एक वेळ फसगत झाली की,'ताक देखील फुंकून प्यायची पाळी येऊ नये' ही खबरदारी घेणे जरुरी आहे. जेथे अवडंबर आहे, कीर्तीचा हव्यास आहे, धनसंपत्तीचा साधनांचा व भक्तांचा मोह आहे तेथे संतत्व कमी व असंतत्व जास्त असे समजावे. भक्तांची गर्दी न वाढवता संत निस्संग राहण्याचा प्रयत्न करीत असतो.
खरा संत झाला सापडला त्याचा त्याक्षणीच उद्धार झाला म्हणून समजावे. श्री गजानन महाराजांसारखे अवतारी संत प्रगट होऊन भक्तजनांच्या कल्याणासाठी या शेगावी असंख्य लीला केल्यात. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन संत महंत व गृहस्थाश्रमी लोकांच्या उद्धाराचा मार्ग सुकर केला.
आपण सेवा कशी करतो हे इतरांना कळत नसले तरी महाराजांना असंख्य डोळे आहेत. ते सर्व काही पाहतात हे पक्के समजावे व आपली सेवा शतगुणी कशी होईल हा प्रयत्न करावा. सेवा कशी कल्याणकारी होते याचे उदाहरण म्हणजे तुकाराम शेगोकार. त्यांनी शुद्धभावाने सेवा केली. महाराजांच्या एका सेवकाचे म्हणणे त्यांना पटले व आपली सेवा सुरू केली. चौदा वर्षानंतर एक दिवस आवार झाडता झाडता कानातून छर्रा गळून पडला. इतके वर्ष डोक्यात असलेला हा छर्रा साधारण वेदनेचा भाग नाही. साध्या डोकेदुखीने आपण घर डोक्यावर घेतो. चिडतो, रागवतो यावरून सर्वांनाच कल्पना करायला हरकत नाही की, तुकारामांना किती सोसावे लागले असेल. त्यांनी १४ वर्षेपर्यंत आपली निष्ठा शाबूत ठेवली. यालाच म्हणतात निष्ठावंत भक्त. खरा भक्त. खरी भक्ती. तुकाराम शेगोकार हे महाराजांवर निष्ठा ठेवून एवढ्या दुःखातही सेवेमध्ये खंड पडू देत नाहीत. त्यांच्या सेवेला अपेक्षांचा संसर्ग नव्हता हे स्पष्ट होते. त्यांनी निरपेक्ष सेवा केली ह्याचे प्रत्यंतर म्हणजे १४ वर्षाचा काळ होय. त्यांच्या सेवेत यातना आड आली नाही. गरीबी आड आली नाही. दुःख निवारले जात नाही मग सेवा कशाला? हा संशय देखील त्यांच्या बुद्धीला निर्माण झाला नाही. तसे जर झाले असते तर एवढी दीर्घकाळ सेवा घडणे संभव नव्हते असे म्हणण्यापेक्षा संभावच नाही असे म्हणणे अधिक योग्य होईल. म्हणूनच लिहावेसे वाटते की सेवा असावी तर तुकाराम शेगोकार यांच्यासारखी. सेवेचे मूल्य केले जाऊ शकत नाही, आकारले जाऊ शकत नाही. सेवेत न मागताच मिळण्याचे सामर्थ्य असते ते मात्र आपल्या सेवेच्या दर्जावर निर्भर असते. सेवा किती शुद्ध, भावपूर्ण व उद्देश किती उदात्त आहे त्यावर हा कृपेचा प्रकार आधारित आहे. म्हणूनच महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावयाची असेल तर श्रद्धा व सबुरी हे लक्षात ठेवणे जरुरी आहे. प्रत्येकाने सेवा करताना तुकाराम शेगोकार यांच्यासारखी सेवा सफल करण्याचा प्रयत्न करावा. संकटे येतील, दुःख येतील पण ती आपली परीक्षा आहे असे समजून आपल्या सेवेस आपणच खोटे ठरवू नये.
तुकाराम शेगोकार आणि श्री गजानन महाराज यांच्या इतर भक्त मंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.