श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प - चौतिसावे - लक्ष्मण हरी जांजळ

शेगांव (वि.प्र.) - अमरावतीच्या भक्तांमध्ये लक्ष्मण हरी जांजळ हे महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर ज्या भक्तांना दर्शन देऊन त्यांना सांभाळले, त्यापैकी हे एक भक्त.
घरगुती कटकटीने लक्ष्मण जांजळ यांचे मन वैतागून गेले होते. अशा वैतागातच काही व्यापारसंबंधीच्या कामासाठी ते मुंबईला गेले. सर्व कामे आटपून ते घराकडे जाण्याच्या हेतूने बोरीबंदर रेल्वे स्टेशनवर आले. रेल्वे स्टेशनवर त्यांना एक परमहंस भेटले. उंच शरीरयष्टी आणि अजानुबाहू असलेले, दृष्टी नसाग्री स्थिर झालेली आणि मुखात सदा ओंकाराचा जप सुरू असलेली ही परमहंस व्यक्ती होती.
पूर्वी अमरावतीला घडलेल्या घटना या परमहंसाने अगदी तंतोतंत सांगितल्या. लक्ष्मण जांजळ यांनी त्या परमहंसाचे दर्शन घेतले आणि पाहता पाहता क्षणार्धात तो परमहंस तेथून गुप्त झाला. आता मात्र जांजळ यांच्या मनाला पक्की खात्री झाली की हा कोणी दुसरा तिसरा नसून आपले शेगावचे सद्गुरु गजानन महाराजच आहेत. त्यांनी आपली अशी वैतागलेली मनस्थिती, वैफल्यग्रस्त विचार ओळखून आपल्याला येथे येऊन मार्गदर्शन केले. लक्ष्मण तेथून घरी आले, ते अगदी प्रसन्न मनस्थितीत. मनाला सर्व नकारात्मक विचार टाकून, घरी येऊन सर्वांशीच पहिल्याप्रमाणे वागू लागले आणि त्यांनी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला.
महाराज आपल्या भक्तांना किती सांभाळतात, हे यावरून लक्षात येते. त्यांना आपल्या भक्ताच्या मनाची स्थिती कळते. तो उदासीन आणि वैफल्यग्रस्त होऊ नये, याची ते काळजी घेतात. "मी अजूनही तुमच्यातच आहे", या गोष्टीचे ते प्रत्यंतर देतात. तेव्हा अनेकांना महाराजांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले, सांभाळले. तसेच आजही ते आपल्या भक्तांवर कृपा करतात, सांभाळतात. त्यांच्या जीवनाला वळण लावतात. यासाठी भक्त तेवढा निष्ठावंत पाहिजे. ही भक्ती दिखाऊ स्वरूपाची नको. अंतरीचा जिव्हाळा पाहिजे. त्याप्रमाणे आचरण पाहिजे म्हणजे महाराजांची कृपा होते यात शंका नाही. आज अनेक भक्तांना महाराज वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात आणि मार्गदर्शन करतात. याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्यावर सद्गुरूंची कृपा कशी होईल याची जीवाला तळमळ असली म्हणजे झाले.
लक्ष्मण हरी जांजळ आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तांची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.