शेगांव (वि.प्र.) - रामचंद्र कृष्णाजी पाटील यांच्यावर गजानन महाराजांची विशेष कृपा आणि प्रेम होते. याचे अनेक दाखले 'गजानन विजय' या ग्रंथामध्ये आहेत. कृष्णाजी पाटील महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते आणि त्यांनी महाराजांची मनोभावे सेवा केली. त्यांच्या सेवेच्या बळाने त्यांना रामचंद्र नावाचा सद्गुणी, सात्विक पिंडाचा पुत्र लाभला. हा मुलगा वडिलांच्या संस्कारात वाढला. वडिलांप्रमाणेच त्याने सेवेचा वसा चालवला.
महाराजांचा सेवेचा जन्मजात वारसा लाभलेले रामचंद्र पाटील सन १९१३ ते १९४८ पर्यंत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापक होते. या पदाचा कारभार सांभाळताना त्यांनी मंदिराच्या बांधकामात अतिशय श्रम घेतले. "गजानन विजय" या ग्रंथाच्या निर्मितीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
एकविसाव्या अध्यायात दासगणू महाराजांनी नमूद केल्याप्रमाणे गजानन महाराज अगदी स्पष्टपणे सांगतात की याचकाला पूजा, अन्न, दक्षिणा दिल्यास ते परमेश्वराला दिल्यासारखेच असते. मात्र त्यासाठी याचक शुद्ध भाव असणारा पाहिजे. त्यालाच सतपात्री दान असे म्हणतात. याचकाला विन्मुख पाठवू नये. त्याने दात्याला घरबसल्या दान देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दात्याला दान देण्यासाठी बाहेर जाऊन अन्नार्थी किंवा भिक्षुकास शोधण्याचे श्रम पडू नयेत, यासाठी याचक स्वतः त्याच्याकडे आला आहे. याचकाचे गुणदोष पाहणे चूक आहे. आपणाला त्याला काही द्यायचे नसेल तर आपणावर तसे बंधन नाही, परंतु त्याला अद्वातद्वा बोलणे किंवा आपल्या हुशारीचे चातुर्य, तत्त्वज्ञान उगाळून पाजणे हे चुकीचे आहे. आपला विवेक जागृत ठेवणे महत्त्वाचे आहे.
एकविसाव्या अध्यायात दासगणू महाराजांनी नमूद केल्याप्रमाणे, रामचंद्र पाटील यांनी गोसाव्याच्या रूपातील याचकासाठी भोजनाचे ताट वाढून आणले. गोसाव्याने प्रेमाने भोजनाचा आस्वाद घेतला. पाटलांनी गोसाव्यास दक्षिणा दिली.
हा सगळा प्रकार भक्ती, भाव, प्रेम आणि दान असा आहे. प्रथम प्रेमाने गोसाव्याचा हात धरून त्याला पाटावर बसवून त्याची पूजा केली, ही झाली भक्ती. या भक्तीत ओथंबलेला हृदयाचा शुद्ध भाव. भावाशिवाय भक्ती घडणे शक्य नाही. पूजा जर प्रेमाशिवाय केली गेली असेल, तर त्यातून कोणतीही उपलब्धता होणे संभव नाही. भक्तीत प्रेम पाहिजे, भाव सुद्धा प्रेमपूर्ण पाहिजे आणि दानही प्रेमपूर्वकच केले गेले पाहिजे. म्हणून प्रेम हा या सर्व प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. प्रेम हे भगवंताचे स्वरूप आहे. रामचंद्र पाटील यांच्यातील विनम्रता वाखाणण्यासारखी होती. अशी विनम्रता, प्रेम, भक्ती अतिशय मोजक्याच भाग्यवान व्यक्तींमध्ये दिसून येते.
रामचंद्र पाटील आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री. गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.