शेगांव (वि.प्र.) - अचलपूर येथील एक सज्जन गृहस्थ गढीकर हे व्यवसायाने वकील पण अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर. त्यांना गुरुचा शोध घ्यायचा होता. बुद्धीवादी विचारांची उच्चशिक्षित अशी ही व्यक्ती. "कोणास गुरु करावे? आपल्याला गुरु मिळतील का? मिळालेच तर, योग्य गुरू कसे ओळखावे? ते आपले कल्याण खरेच करतील का?" अशा अनेक प्रश्नांनी ते साशंक होते. सर्व समस्यांचे निर्मूलन करण्यास श्री गजानन महाराजच योग्य आहेत, समर्थ आहेत, असा निर्धार करून ते एकदा शेगावला दर्शनासाठी आले. येऊन दर्शन घेतात तोच महाराज म्हणाले, "तुझा सद्गुरु आप्पाजी आर्वीला तुझी वाट पाहत आहे." सर्व समस्यांचे निराकरण काहीही न बोलता न सांगता झाले. गढीकरांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळाले. ते आर्वी येथे गेले आणि आप्पाजी महाराज यांना त्यांनी गुरु केले.
भक्ताच्या अज्ञानाची जळमटे आपोआप भस्मसात होऊन तो क्षणार्धात कृपापात्र करण्याचे सामर्थ्य गजानन महाराजांच्या दृष्टीत होते. त्याचप्रमाणे जेथे खऱ्या ज्ञानाची जिज्ञासा असेल, जो आपले जीवन कसे सार्थकी लागेल, या मनोपातळीवर येऊन ठेपला आहे; त्याला पूढचा मार्ग किंवा ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्यासाठी महाराज धावून जात असत. महाराज सर्वज्ञात असल्याने आणि सर्वव्यापी असल्याने त्या जीवाची तळमळ महाराजांपासून लपूच शकत नाही. महाराज त्याची समस्या सोडवण्यासाठी जात. एखादा भक्त आशेने गुरुची प्राप्ती व्हावी, सद्गुरूची कृपा व्हावी, म्हणून फिरत फिरत या संताकडे जातो, त्या संताकडे जातो. त्याकाळी असे अनेक जीव गजानन महाराज यांच्याकडे यायचे. महाराज सर्वांचे सद्गुरु आहेत. पण काही जीवांचा मार्गदर्शक गुरु जेथे आहे, तेथे महाराज त्या भक्ताला पाठवत असत.
गढीकर आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.