शेगांव (वि.प्र.) - बाळशास्त्री म्हणजे विद्वत्तेने संपन्न असलेल्या व्यक्तिमत्व. ते पुराण कथा निरूपण आणि कीर्तन करत असत. त्यांना अध्यात्माची आणि सत्संगाची आवड होती. शंकराविषयी अपार भक्ती असल्याने ते सतत त्रंबकेश्वर येथे जात असत. त्यांच्या अंत:करणात शिवाच्या सगुण दर्शनाची प्रबळ इच्छा होती.
एकदा ते त्रंबकेश्वर येथे गेले होते. भक्तगण गोदावरीमध्ये स्नान करीत होते. तर काही जण ध्यान करीत बसले होते. तेथे काही ऋषी, पंडित, शास्त्री, विद्वान यांची शंकर आणि विष्णू यांच्या ज्येष्ठतेवर, योग्यतेवर चर्चा सुरू होती. या चर्चेत बाळशास्त्री सुद्धा सहभागी झाले होते. त्याचवेळी एक दिगंबर सत्पुरुष या सर्वांकडे पाहत, त्यांची चर्चा ऐकत जवळच एका झाडाखाली सावलीत येऊन बसले. बाळशास्त्री यांना वृक्षाखाली बसलेल्या त्या महापुरुषामध्ये साक्षात श्रीशिवशंकराचे दर्शन झाले. बाळशास्त्री त्या महापुरुषाकडे धावत गेले. त्यांना वंदन करून विचारू लागले, "महाराज! आपण कोण? कोठले? असे निमग्न का बसलात? आपणास कुठे जायचे आहे?" महाराजांनी बाळशास्त्रींच्या फक्त शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिले, "मला विदर्भात जावेसे वाटते. तिथे मला अकोट येथे संत श्री नरसिंगजी यांच्या भेटीस जायचे आहे." बाळशास्त्रींना पुन्हा महाराजांचे ठाई श्रीशिवशंकराचे स्वरूप भासू लागले. पुन्हा त्यांनी महाराजांचे पाय धरले. कलियुगात शिवशंकर संतरूपाने अवतरले आहेत, याची त्यांना खात्री झाली. ते महाराजांना म्हणाले, "मलासुद्धा विदर्भात जायचे आहे. कारंजा माझे गाव आहे. आपण माझ्यासोबत चलावे." अशी प्रार्थना त्यांनी केली. बाळशास्त्रींचा शुद्धभाव पाहून महाराजांनी होकार दिला.
गजानन महाराज बाळशास्त्री यांच्यासोबत रेल्वेने नाशिकहून मुर्तीजापुरला आले. दोघे मुर्तीजापुरला उतरले. महाराज दिगंबर अवस्थेत तिथे फिरत होते. त्यांचे असे फिरणे सहप्रवाशांना अजबपणाचे वाटले. बाळशास्त्रींनी मुर्तीजापुरला शेजारच्या दुकानातून एक नवीन धोतर विकत आणले आणि महाराजांना नेसवले. त्यानंतर ते बैलगाडीने गजानन महाराजांना घेऊन कारंजा येथे गेले.
बाळशास्त्री केशवमंदिराशेजारी असलेल्या आपल्या घरी गजानन महाराजांना घेऊन आले. महाराजांना आसनावर बसवून बाळशास्त्री यांनी सहकुटुंब त्यांचे यथोचित पूजन केले. रात्री एकादशीचे जागरण झालेले होते. द्वादशीच्या दिवशी त्यांनी ब्राह्मणांना निमंत्रित केले होते आणि कार्यक्रम थाटामाटात साजरा केला. गजानन महाराजांना वस्त्रालंकारांनी भूषवून त्यांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्या आणि सदभावे पूजन करून त्यांना जेवू घातले. सर्वजण महाराजांचे दर्शन घेऊन भोजन करून तृप्त झाले.
बाळशास्त्री महाराजांना पूर्णपणे शरण आले होते. त्यांची भक्ती पाहून महाराजांनी त्यांना शिवमंत्र दिला आणि त्यांना आशीर्वाद देऊन बोध केला की, "भगवंताचे नित्यचिंतन करीत परमार्थ साधून घे. इष्टमित्र, बंधू आणी आप्त यांच्याविषयी कामना नाशिवंत आहेत. त्यांचा त्याग कर. प्रभूचे भजन आणि स्मरण कर. धीर सोडू नकोस. भोळा शिवशंकर तुझ्या हृदयातच आहे. त्याचे स्मरण करीत रहा. अनन्यभावाने ईश्वराला शरण जा." असा बोध करून महाराज कारंजा येथून पुढच्या प्रवासाला निघाले.
बाळशास्त्री आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.
