बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही सिनेमांना सिनेमागृहे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळात सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शक तसेच सिनेमागृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री.मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, निश्चित कार्यप्रणाली करण्यामागे सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृह विभागासह विविध विभागांचे समन्वय आवश्यक असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली करण्यात येईल.
नुकतीच पार पडलेली बैठकीत श्री.मुनगंटीवार यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठी सिनेमा निर्मात्यांनी आपली निवेदने दयावीत जेणेकरुन याविषयाबाबत विस्तृत बैठक 15 जून नंतर घेण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले. अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना याबाबतही काही नियमावली तयार करता येईल का याबाबतचा अभ्यासही करण्यात यावा अशा सूचनाही श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.