शेगांव (वि.प्र.) - १९ मार्च १८७३ रोजी बऱ्हाणपूर येथे देव मास्तरांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र पुरुषोत्तमपंत देव असे होते. जलंब, खामगाव आणि अकोला येथे त्यांचे शिक्षण झाले. ते अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून शालेय जीवनात प्रसिद्ध होते.
सन १८९७ ते १९२७ या तीस वर्षात त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. त्यांनी स्वतःला शाळेपुरतेच मर्यादित न ठेवता "जनसेवा हीच ईश्वर सेवा" या भावनेने कार्य केले. त्यांनी संतसेवा ईशचिंतन आणि सद्गुरूकृपेने उन्नतीचा एक-एक टप्पा आत्मसात केला आणि त्यात पूर्णत्व मिळवून ते देव मास्तर बनले. सर्वजण अत्यंत आदराने त्यांना भाऊसाहेब उर्फ देव मास्तर असे संबोधू लागले.
एकदा शेगावच्या गजानन महाराजांचे खामगाव मध्ये आगमन झाले. महाराज खामगावी आल्याचे कळताच देव मास्तर आनंदाने तिथे दर्शनाला गेले. दर्शन घेऊन ते खाली बसत नाही, तोच त्यांच्या मनीचा भाव महाराजांनी ओळखला. तसेच हा गृहस्थ परमार्थाला योग्य असला तरी, त्याला कडकडीत वैराग्याची आवश्यकता आहे हे त्यांनी जाणले. त्यांना उद्देशून महाराज म्हणाले, "जानाही जरुरी है, लाभ होगा" हे आपल्याच प्रश्नाचे उत्तर आहे, असे देव मास्तरांनी तात्काळ ओळखले. पण ते अनपेक्षित होते. मनाच्या विरुद्ध होते. त्यांच्यासाठी ते दुःखाच्या खाईत ढकलणारे आहे, असे त्यांना वाटले. पण पुन्हा पुन्हा महाराजांनी तेच उद्गार काढल्यामुळे 'नोकरीमध्ये बदली होऊन दुसऱ्या गावी' जाण्यातच आपला खरा फायदा आहे, हे त्यांनी समजले. त्यांनी महाराजांना पुन्हा वंदन केले आणि घरी येऊन "बदली रद्द करावी" असा लिहिलेला अर्ज फाडून टाकला. शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना आपण बदलीसाठी दुसऱ्या गावी जाण्यास तयार आहोत, हे कळवले. मातापित्यांची निराशा झाली.
पुढे ते गजानन महाराजांच्या दर्शनाला नेहमी जात असत. महाराजांनी त्यांना सेवा आणि साधनेतील राजगृह्य सांगितले. त्या मार्गावर ते सतत चालत राहिले आणि श्रेष्ठत्व प्राप्त करू शकले. संत वचनावर केवढी ही श्रद्धा! त्यामुळे ते त्यांच्या शिक्षकी पेशात पूर्णपणे यशस्वी झाले. शिवाय आत्मकल्याण साधून पूर्णत्व प्राप्त करू शकले.
सन १९०९ मधला प्रसंग. देव मास्तर शाळेतून परत आपल्या घराकडे मार्तंडराव देशमुख यांच्या सोबत निघाले होते. खांद्यावरील उपरण्याच्या पदरात बांधलेल्या पाच-सहा आंब्याच्या कैरी कैऱ्यांची गाठोडी खांद्यावरून मागे लोंबत होती. तेवढ्यात मागून गजानन महाराजांची दमणी आली. महाराजांचे लक्ष देव मास्तरांकडे गेले. तोच महाराज दमणीतून उडी घेऊन धावतच त्यांच्या मागे आले आणि खांद्यावरून लोंबकळत असलेली कैऱ्यांची गाठोडी एकदम हिसकावली आणि ती सोडून त्यातल्या कैऱ्या खाण्यास सुरुवात केली. देव मास्तर मागे वळून पाहतात तो गजानन महाराज! त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. त्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला. तोच महाराज त्यांना म्हणाले, "अरे बराच आहेस तू! या कैऱ्या तशाच खाऊ का? जा मीठ घेऊन लवकर ये." देव मास्तर धावतच जवळच्या दुकानात गेले आणि मीठ घेऊन आले. महाराजांनी त्या मिठाबरोबर कैऱ्या खात खात काही गुजगोष्टी त्यांच्यासोबत केल्या. शेवटी एक उष्टी कैरी आपल्या ह्या सदभक्ताला खायला दिली आणि आशीर्वाद देऊन ते परत दमणीत येऊन बसले. त्या प्रसादाने देव मास्तरांना अतिशय अवर्णनीय आनंद झाला.
देव मास्तर यांच्या नोकरीचा शेवटचा टप्पा भांबेरी या विदर्भातील छोट्याशा गावी होता. मास्तरांचे अजोड आध्यात्मिक सामर्थ्य, समजोपयोगी कार्याची आंतरिक तळमळ, क्षमाशीलता, कर्तव्यपरायणता आणि सच्चरित्र आदर्श जीवन आजही हा भांबेरीला स्मारक रूपाने उभे आहे. या गावात त्यांनी नोकरी सुरू असतानाच मोठे सामाजिक कार्य केले. ते समाजप्रबोधनासाठी प्रवचन करीत असत. गुरुजींचे आदर्श वर्तन, ब्रह्मचर्याचे तेज आणि आत्मिक बल यांचा सर्व श्रोत्यांच्या मनावर पगडा राहत असे. देव मास्तर श्रमदानाला अतिशय महत्त्व देत असत. या श्रमदानातून त्यांनी रस्ते दुरुस्तीचे काम केले. ते रोग्यांची सेवा करत. अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कार्यक्रमही राबवत असत. देव मास्तरांना संत समागम मनापासून आवडत असे. सत्संगाचा आणि संतसेवेचा ते लाभ घेत असत.
सन १९४८ मध्ये भांबेरी या गावात त्यांनी मोठे श्रीराम मंदिर बांधले. हे मंदिर बांधण्याचा त्यांचा विशाल दृष्टिकोन, गावकऱ्यांचा आग्रह आणि 'परोपकारात देह झिजवण्याचा' त्यांना मिळालेला गुरुचा आदेश आणि गजानन महाराजांची कार्य प्रवण करणारी भविष्यवाणी त्यांच्या अंत:करणात घुमत होती. तिला अनुसरूनच तेथे भव्य आणि दिव्य असे श्रीराम मंदिर निर्माण झाले.
रामचंद्र देव मास्तर आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

