शेगांव (वि.प्र.) - झुंबरलाल हा नागपुरातील स्वच्छ, पारदर्शी मनाचा आणि धार्मिक वृत्तीचा असा सद्गृहस्थ होता. त्याच्या मनात संतांबद्दल अतिशय श्रद्धा होती. झुंबरलाल धनसंपन्न होता. गजानन महाराज नागपूर येथे बुटींकडे आले आहेत, ही वार्ता कानी येताच झुंबरलाल महाराजांच्या दर्शनास आले. त्यांनी महाराजांचे श्रेष्ठत्व जाणले होते. असंख्य भक्तांच्या गर्दीत झुंबरलाल यांनी महाराजांचे दर्शन घेतले. तेव्हा महाराजांनी त्यांच्या पाठीत बुक्का मारला आणि महाराज म्हणाले, "तुझे भाग्य थोर आहे. या भाग्याचा उपयोग ईश्वर कामी येऊ दे." काही दिवस नागपुरात राहून गजानन महाराज पुढे शेगावी परत आले.
झुंबरलाल तसा सधन गृहस्थ होता. त्याच्याजवळ भरपूर धन होते. जे त्यांनी गुप्तपणे घरातच ठेवले होते. मात्र अचानकपणे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी गुप्तधन कुठे ठेवलं असावे हे माहिती नसल्यामुळे झुंबरलाल काळजीत पडला. एके रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात त्याला सद्गुरु गजानन महाराजांनी सांगितले की, शेगावला दर्शनाला ये. सकाळी उठून झुंबरलालने त्याच्या आईस रात्री पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि "मी शेगावला जातो" असे सांगून शेगावात आला. शेगावात त्याने महाराजांचे दर्शन घेतले. महाराज म्हणाले, "तुझा हेतू मला कळला. ईश्वरावर श्रद्धा ठेव. धन तुझ्या घरामध्येच आहे. देव्हाऱ्याजवळ कोपऱ्यात खोद. म्हणजे तुला धन सापडेल". हे ऐकून झुंबरलाल आनंदी झाला. महाराजांच दर्शन घेऊन त्याने नागपूरला प्रयाण केले. घरी येताच महाराजांच्या निर्देशानुसार त्याला गुप्तधन मिळाले. अशा तऱ्हेने महाराजांच्या कृपेने झुंबरलाल अधिकच धनवान झाला. पुढे आयुष्यातील बराचसा काळ त्याने महाराजांच्या सेवेत घालवला.
झुंबरलाल आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.