शेगांव (वि.प्र.) - गजानन विजय ग्रंथामध्ये ज्यांचा एकनिष्ठ भक्त म्हणून गौरव करण्यात आला आहे, ते नारायण जामकर हे मूळचे अमरावतीचे रहिवासी.
स्वामी दत्तात्रय केदार |
दुसरा नारायण जामकर |
निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार |
तो दुधाहारी बुवा ||
ऐसे श्रोते तिघेजण |
स्वामींचे भक्त निर्वाण |
ज्यांनी आपुले तनमन |
समर्थचरणी अर्पिले ||
(अध्याय १९, ओवी १५५,१५६)
नारायण जामकर हे शिक्षक होते. त्यांनी काही दिवस ए डी आय या पदावर काम केले होते. गजानन महाराज अमरावतीला नेहमी जात असत. त्याप्रसंगीच नारायण जामकर यांची महाराजांशी भेट झाली आणि ते महाराजांचे भक्त बनले. नारायण जामकर शेगावी येऊन महाराजांचे सेवेत राहत असत. महाराजांनी संजीवन समाधी घेईपर्यंत जामकर नेहमी त्यांच्या सेवेत होतेच आणि नंतर सुद्धा ते दर्शनासाठी शेगावला येत असत.
अध्यात्मिकदृष्ट्या अतिशय उच्च स्थिती प्राप्त केलेल्या काही मोजक्या भक्तांपैकी ते एक होते.
तन-मन-धनाने त्यांनी सद्गुरूंची सेवा केली. त्यांनी १९३८ मध्ये अमरावती येथील कुंभारवाड्यात गजानन महाराजांचे मंदिर बांधले. कुंभारवाड्यातील भाजी बाजारातील महाराजांच्या मंदिरात आजही अनेक कार्यक्रम पार पडतात. नारायण जामकर यांनी आपली संपूर्ण संपत्ती गजानन महाराजांच्या भक्तीच्या प्रसारासाठी खर्च केली. ते संपूर्णपणे गजाननमय झाले होते. अमरावती येथे सन १९६१ मध्ये त्यांचे निधन झाले.
नारायण जामकर आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.