शेगांव (वि.प्र.) - अकोला जिल्ह्यातील मंगरूळपीर या गावी हरिभाऊ शिंदे आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई हे गुरव दांपत्य राहत होते. त्यांचा घरोघरी बेलाची पाने वाटण्याचा उद्योग होता. अशा या थोर शिवभक्त पती-पत्नीच्या घरात रामचंद्र यांचा जन्म झाला. ते दिसायला गौरवर्णाचे, तेज:पुंज कांती असलेले बालक होते. जणू काही पूर्वजन्मीचा योगी पुन्हा जन्माला आला असावा, असे वाटत असे. बालपणापासूनच या मुलाची लक्षणे सामान्य मुलांपेक्षा वेगळी होती. तो जसजसा मोठा होऊ लागला तसतशी त्याची धार्मिक लक्षणे आणि गुण प्रगट व्हायला लागले. या गुणांमुळे तो सर्वांना आवडू लागला. आपला मुलगा शिकावा. त्याला चांगले वळण लागावे. म्हणून वडिलांनी रामचंद्र याला शाळेत टाकले. रामचंद्र शाळेत जाऊ लागला. तिथले वर्गशिक्षक योगाभ्यास करणारे होते. ते मुलांना योगाभ्यास आणि व्यायाम शिकवीत. रामचंद्र याला अभ्यासापेक्षा ध्यानधारणा आणि व्यायाम आवडत असे.
पुढे रामचंद्र यांनी गृहस्थ धर्माचा स्वीकार केला. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांना एक मुलगा झाला. आता गुरुकृपा केव्हा होईल, कशी होईल याची तळमळ त्यांना सतत असे.
रामचंद्र गावातील एका वाण्याच्या दुकानात काम करू लागले. एकदा त्या वाण्याने आणि त्याच्या पत्नीने रामचंद्राचा विनाकारण अपमान केला, त्याला दोष दिला. त्यामुळे रामचंद्रांनी ते काम सोडून दिले आणि आपला मुक्काम मंदिरात हलवला. त्यानंतर वाण्याला आणि त्याच्या पत्नीला आपली चूक लक्षात आली. रामचंद्रांचे पाय त्यांनी धरले. त्यावेळी रामचंद्रांनी त्यांना उपदेश केला.
तापी आणि पूर्ण संगमावर महाशिवरात्रीला चांगदेवाची यात्रा असते. रामचंद्राला तेथे जाणारे लोक भेटले. तेव्हा आम्हालासुद्धा बरोबर न्यावे असे रामचंद्र त्या भक्तांना म्हणाला. त्यानुसार एकादशीच्या दिवशी सर्वजण त्या तीर्थक्षेत्री पोहोचले. स्नान करून चांगदेवाच्या दर्शनाला रामचंद्र जेव्हा निघाला, तेव्हा एक दिगंबर योगी त्याच्यासमोर उभा ठाकला. अशाप्रकारे चांगदेवाच्या क्षेत्री सद्गुरु गजानन महाराजांनी रामचंद्रावर कृपा केली. सर्व बंधने तुटून पडली. हृदयात गुरुचे चरण स्थिरावले. महाशिवरात्रीच्या महापर्वावर गजानन महाराजांनी रामचंद्राला दर्शन दिले. हे योगी शेगावचे गजानन महाराज आहेत, हे त्याने बरोबर ओळखले.
आता गुरुकृपा झाली, याव्यतिरिक्त दुसरे काहीही नको. हे जाणून त्याने भ्रमण सुरू केले. अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी, देहू, आळंदी, माहूर, कारंजा लाड अशा अनेक ठिकाणी तो पायी फिरून आला. नंतर शेगावला आला. सद्गुरु गजानन महाराजांची सेवा करू लागला. महाराजांनी संजीवन समाधी घेईपर्यंत तो महाराजांच्या सेवेत होता.
पुढे रामचंद्र यांना गजानन महाराजांनी संकेत दिला की, तुझी कर्मभूमी खांडवी आहे. तेथे जाऊन आपले कार्य करावे आणि लोकांचा उद्धार करावा. सद्गुरूंच्या संकेतानुसार त्यांनी पुन्हा भ्रमण सुरू केले. सन १९४२ मध्ये ते खांडवी येथे आले. खांडवी हे छोटेसे गाव जळगाव-जामोद तालुक्यात आहे. हे गाव सिद्ध, योगी यांचे स्थान असल्याने महाराजांनी रामचंद्र यांना तिथे जाण्याचा संकेत दिला. तेथे त्यांनी अनेक लोकांना सन्मार्गी लावले. खांडवी येथे गणपत पाटील यांना त्यांनी कर्मबोध केला. त्यांनी स्वतःचे जीवन लोकांच्या उद्धारासाठी झिजविले. श्रावण शुद्ध त्रयोदशी, सन १९८५ या दिवशी त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. तेथे त्यांना समाधी देण्यात आली. प्रत्येक भक्ताने या ठिकाणी जाऊन गजानन महाराजांच्या या थोर भक्ताच्या समाधीचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य करून घ्यावे.
रामचंद्र गुरव आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.
