शेगांव (वि.प्र.) - दादासाहेब खापर्डे यांच्या "खापर्डे चरित्र" मध्ये आप्पा महाराज यांचा उल्लेख आहे. सन १९०२ च्या सप्टेंबर महिन्यात आप्पा महाराजांचे दादासाहेब खापर्डे यांच्या घरी आगमन झाले होते. ते एक तपस्वी सत्पुरुष होते. आप्पा महाराज हे गजानन महाराज यांचे निस्सिम भक्त आणि एकनिष्ठ शिष्य होते. दादासाहेबांचीसुद्धा आप्पा महाराजांवर श्रद्धा बसली होती. ते दादासाहेबांच्या घरी आले की काही दिवस तिथेच मुक्काम करत असत. त्यांची वृत्ती अतिशय निस्पृह होती. अंगावरच्या वस्त्रापलीकडे त्यांच्या संग्रही काहीही नसे. ते नित्य नामस्मरणात असत. वर्ण कृष्ण, शरीर कृष, मूर्ती ठेंगणी अशा प्रकारचे अप्पा महाराज यांचे व्यक्तिमत्व होते. ते सर्वांशी प्रेमाने वागत. ते अध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्तरावर होते. पण त्यांनी कधीही कुठलाही चमत्कार करून दाखवला नाही किंवा स्वतःचा शिष्यवर्ग सुद्धा निर्माण केला नाही.
त्यानंतर काही कालावधीने एकदा दादासाहेब खापर्डे यांचे शेगावला जाणे झाले. त्यावेळी त्यांनी आप्पा महाराज यांच्या सल्ल्यानुसार तेथे मुक्काम सुद्धा केला.
स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा शिल्लक ठेवावा याची आप्पा महाराज यांना कधीही गरज वाटली नाही. कारण ते खऱ्या अर्थाने गुरुशी तादात्म्य पावलेले होते. त्यांनी आपले सर्व आयुष्य आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केलेले होते. त्यांना कुठल्याही गोष्टीची लालसा नव्हती. श्रेष्ठ अपरिग्रह आणि त्यांचे वर्तन यावरून त्यांच्या संतत्वाची प्रचिती येते.
आप्पा महाराज आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.