शेगांव (वि.प्र.) - रामदेव मोदी यांचा जन्म शेगाव येथे झाला. ते अतिशय धार्मिक वृत्तीचे आणि उदार मनाचे होते. गजानन महाराजांवर त्यांची अतिशय श्रद्धा होती. घरी धन संपत्ती भरपूर होती. प्रचंड प्रमाणात शेतीवाडी होती. शेगावात त्यांचा सर्वात मोठा जिनिंग प्रेस होता. कापसाचा मोठा व्यापार होता. इतके वैभव असून सुद्धा त्यांच्यामध्ये अहंकार नव्हता. रोज सायंकाळी गजानन महाराजांच्या दर्शनाला ते मठात येत असत.
गजानन महाराजांना विनंती करून त्यांनी सन १९०२ मध्ये आपल्या घरी आणले. महाराजांना उच्चासनावर बसून आदराने गंध अक्षता लावून, गळ्यात फुलांचा हार घातला. महाराजांना पंचपक्वान्नाचे भोजन दिले. या थोर संतांचे पाय आपल्या घरात लागले, याचा रामदेवांना खूप आनंद झाला. आपला जन्म कृतार्थ झाला असे त्यांना वाटले. आपल्याला मुलगा व्हावा ही इच्छा त्यांनी महाराजांपुढे महाराजांना सांगितली. त्यावेळी महाराजांनी शेठजींना आशीर्वाद दिला. महाराजांनी शेठजींना उपदेश केला, "तुझे पुण्य भरपूर आहे, त्यामुळेच तुला नरदेह प्राप्त झाला आहे. गरिबांविषयी प्रेम ठेव. त्या कारणाने पुण्यात आणखी भर पडेल. दानधर्म कर. सगळे सोयरे यांच्याशी चांगले संबंध ठेव. पत्नी, पुत्र आणि धन यांच्या विषयी आसक्ती बाळगू नकोस. सदा परोपकार करीत जा. धन हे मृगजळाप्रमाणे आहे. त्याचा काहीही भरवसा नसतो. हे सगळे अशाश्वत आहे. जीव हा सद्गुरूच्या आश्रयावाचून कुचकामी ठरतो. अनुभवावाचून सर्व ज्ञान व्यर्थ आहे."
महाराजांच्या कृपेने शेठजींना पुढे मुलगा झाला. शेठजींनी महाराजांच्या उपदेशानुसार आपले पुढील जीवनकार्य कटाक्षाने केले. शेटजी नेहमी गरिबांना अन्नदान, वस्त्रदान करीत असत. त्यांनी आपली शेतीसुद्धा बऱ्याच प्रमाणात दान केली. पाणपोया बांधल्या आणि जलदानाचे कार्य केले. पुढे गजानन महाराज संस्थानचे ते अध्यक्ष बनले. त्यांनी संस्थांमध्ये सेवा समर्पित केली. १९१९ मध्ये ते शेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष बनले. त्यावेळी त्यांनी शेगावात नळ योजना सुरू केली आणि जनतेची सोय केली. शेठजींनी हयातीत असेपर्यंत गजानन महाराजांनी केलेल्या बोधाचे पालन केले. ते आयुष्यभर परोपकाराने जगले आणि पुढे वृद्धापकाळाने शेगावमध्ये त्यांचे निधन झाले.
रामदेव मोदी आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.