नागपुर (वि.प्र.) - सध्या महाराष्ट्रातले व देशातले राजकारण अत्यंत गढूळ झाले आहे कोणताही नेता व पक्ष निष्ठावंत राहिला नाही. निष्ठावंत या शब्दावर आता विश्वासच राहिला नाही. सर्वच नेते स्वार्थी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात कोलांटवड्या मारणे सुरू आहे. महाराष्ट्रात एक वर्षापूर्वी जे घडलं तेच आता सुरू आहे. पहिला एपिसोड संपला आता दुसरा एपिसोड सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता याला अक्षरशा कंटाळली आहे.सरकारचे जनतेच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे,महागाईने उच्चांक गाठला आहे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही या प्रश्नाकडे कोणताही पक्ष किंवा नेता गंभीरतेने लक्ष देत नाही. आपली आमदारकी, आपलं मंत्रीपद कसं वाचवता येईल आपला ईडी पासून कसा बचाव होईल याकडेच सर्वांचं लक्ष आहे.
या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत गलिच्छ राजकारणाला सुरुवात केली आहे .ई डी. सी बी. आय. चा धाक दाखवून विरोधी पक्षातल्या नेत्यांना धमकावून, खोक्याचे प्रलोभन देऊन पक्ष बदलविण्यास प्रवृत्त केल्या जात आहे. नरेंद्र मोदी यांना या देशांमध्ये कोणताही विरोधी पक्ष, कोणताही प्रादेशिक पक्ष नको आहे. तोडो फोटो राज करो हीच भारतीय जनता पक्षाची पॉलिसी आहे.
भारतीय जनता पक्ष आता पहिले सारखा राहिला नाही. भारतीय जनता पार्टीकडे आपण एक आदर्श राजकीय पक्ष म्हणून बघत होतो. अटलजी अडवाणीच्या काळातील भाजप आता राहिला नाही. आता भाजपचाही काँग्रेस झाला आहे.
त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात उभी फूट पाडली आहे. आता भाजपचे हिंदुत्व कुठे गेले? सत्तेसाठी आपले राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात जात आहे. कालपर्यंत भारतीय जनता पार्टीला शिव्या घालणारे राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहे. आता त्यांचेच गुणगान करणे सुरू केले आहे.जनतेने व कार्यकर्त्यांनी आता कोणावर विश्वास ठेवावा हा मोठा एक प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टीतून कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे, धडा घेतला पाहिजे, कारण नेता पक्ष बदलावतो परंतु कार्यकर्ता मात्र पक्ष बदलवत नाही. आपला नेता जिकडे जातो तिकडे कार्यकर्ता जातो. राजकारण हा धंदा झाला आहे. पूर्वी समाजाच हित साधण्यासाठी लोक राजकारणात यायचे परंतु आता एक व्यवसाय म्हणून राजकारणाकडे बघितल्या जाते यात मात्र निष्ठावंत कार्यकर्त्याचे मरण होत आहे. कार्यकर्ता आयुष्यभर या ना त्या नेत्याच्या मागे धावत असतो. निष्ठावंत म्हणून त्याची सेवा करत असतो कार्यकर्ता शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहतो तो नेता होत नाही कारण नेता होण्यासाठी आर्थिक सुबत्ता पाहिजे. ज्याची आर्थिक स्थिती चांगली ज्याच्याजवळ कोणत्याही मार्गाने कमावलेला पैसा असेल तोच नेता होऊ शकतो. परंतु कार्यकर्ता मात्र कार्यकर्ताच राहतो मोर्चे मिळावे शक्ती प्रदर्शन,याला पाठिंबा त्याला पाठिंबा याच्या मोर्चा त्याच्या मोर्चात जाण्यासाठीच कार्यकर्त्याचा उपयोग केला जातो.
आता मात्र कार्यकर्त्यांनी सावध झाला पाहिजे. जे नेते या पक्षातून त्या पक्षात जातात त्यांना अद्दल घडवली पाहिजे. अशा खोकेबाज नेत्यांचे स्वागत करणे, फटाके फोडणे, त्याच्या समर्थनार्थ रॅली काढणे बॅनर बाजी करणे हे धंदे बंद केले पाहिजे. अशा नेत्यांचे आपआपल्या गावात त्याच्या निर्वाचन क्षेत्रात मोठ मोठाले निषेधाचे बॅनर लावले पाहिजे त्याला चपलांचा हार चढवला पाहिजे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही नेते मंडळी वठणीवर येणार नाही. आपल्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेता पक्ष बदलविण्याचा शंभर वेळा विचार करेल.
परंतु आपण जर त्यांच्या मागे धावत राहिलो त्यांची हाजी हुजुरी करीत राहिलो तर ते असेच वागत राहील कारण त्यांना माहित आहे आपण कुठल्याही पक्षात गेलो तरी आपला कार्यकर्ता आपल्या सोबत आहे. कार्यकर्ता हेच नेत्यांचं भंडवल आहे. नेत्यांच्या मागे कार्यकर्ता नसला तर नेता शून्य आहे.आणि म्हणून कार्यकर्त्यांनो आता तरी या संधी साधून नेत्यांपासून सावध व्हा. आपला वेळ आणि पैसा यांच्य मागे खर्च करू नका आपली स्वतःची आर्थिक बाजू मजबूत करा.नोकरी व्यवसाय करा. आपलं कुटुंब सांभाळा काम झालं की नेता तुम्हाला फुकट विचारणार आहे म्हणून कार्यकर्त्यांनो सावध व्हा नेत्यांच्या मागे धावणे बंद करा.
✍️
सी. एम. लोणारे, नागपूर