बुलडाणा (वि.प्र.) : देशभरातील क्रमांक एक ची संघटना असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या या शिखर अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार, खा. हेमंत पाटील, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्यध्यक्ष संजय आवटे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे उपस्थित राहणार आहेत. पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, नव्याने विकसित होत असलेल्या पत्रकारितेच्या तंत्रज्ञानासाठी या अधिवेशनामध्ये चर्चाविनिमय होणार आहे. यात काही ठराव घेतले जाणार आहेत, जे राज्य आणि केंद्र सरकारला दिले जाणार आहेत. यामुळे महत्त्वपूर्ण बनलेल्या या अधिवेशनासाठी राज्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. म्हस्के यांनी केले आहे.