भद्रावती (वि.प्र.) : येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्वर्यू सेवाव्रती तथा दातृत्वशिल व्यक्तीमत्व स्व.जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्वर्गरथ लोकार्पण सोहळा सुरक्षा नगर येथील भव्य प्रांगणात पार पडला.
वं.राष्ट्रसंतांच्या विचाराप्रमाणे अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांनी समाजसेवेचे कार्य केले अशा स्व.जगन्नाथदादा यांच्या चतुर्थ स्मृतिदिन सोहळ्याची सुरुवात सामुदायिक प्रार्थनेने झाली. त्यानंतर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल २२ सामाजिक संस्थांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. त्यानंतर गावंडे परिवाराच्या वतीने जनसेवार्थ सुरू केलेल्या स्वर्गरथाचे लोकार्पण सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोकसेवा मंडळातर्फे दिलेल्या शवपेटीचे बळवंतरावजी गुंडावार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.या उल्लेखनीय उपक्रमाची प्रेरणा घेत अतुलजी गुंडावार यांनी सरण कटघरासाठी ४२ हजार रुपये दान दिले.तसेच गुणवंत कुत्तरमारे यांनी ५० हजार रुपये श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराकरीता दिले तर अभय टेपाले यांनी स्टील ची तिरडी दान दिली व चालक संघटनेतर्फे गरीबांच्या अंत्यसंस्कारासाठी सेवा देण्याचे कबूल केले.याप्रसंगी अशोक गौरकार यांनी आर्थिक मदतीचा संकल्प केला.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी लक्ष्मणरावजी गमे,हंसराजभैय्या अहिर, अनिलभाऊ धानोरकर, रमेशजी राजुरकर,बळवंतराव गुंडावार, मनोज महाराज चौबे, डॉ.दयाराम चौधरी, रुपलाल कावळे, चंद्रकांत गुंडावार, सुनील देशमुख, घनश्याम पिकले, श्रीखंडे दादा, केशवानंद मेश्राम, धनराज अस्वले,अंकुश आगलावे, सुषमाताई शिंदे ,राजजी घुमणार उपस्थित होते. यानंतर सप्तखंजेरी निर्माते सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्व.जगन्नाथ दादांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. शेवटी राष्ट्रवंदना आणि जयघोष घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.