दारु परवाना वितरणातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी .!

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी .!

चंद्रपूर (वि. प्र.) : दि.१० - सन २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही त्याचे पुढे काहीच झाले नाही आणि मद्य परवाना वितरणातील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपूर्ण गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही सांगितले आहे. दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. येणाऱ्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि स्वतःकडेच कुलूपबंद केल्या. अनेक ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही मद्य परवाने देण्यात आले.गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथे तर रमाई आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरी बियर बार देण्यात आला, याकडेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. 
त्याचवेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) श्री. विश्वास नांगरे पाटील यांनाही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणात कसून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
यासंदर्भात ज्यांना तक्रारी करायच्या असतील त्यांनी भाजपा जनसंपर्क कार्यालयातील 95527 99608 या मोबाईल नंबर व्हॉट्सॲप तक्रारी पाठवाव्यात. दूरध्वनीवरून प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी तक्रारकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा (7261967820), भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे (9822255932) यांच्याशी संपर्क साधावा.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा .!
पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.!
ना.मुनगंटीवार यांच्या भाजपा कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्तांना मदतकार्य करण्याच्या सूचना .!

चंद्रपूर : दि.१० - वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले, घरांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. या संपूर्ण नुकसानाचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशाही सूचना केल्या. त्याचवेळी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनाही त्यांनी प्रत्यक्ष गावागावांत जाऊन नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्यक्ष भेट घेत मदतकार्य करा अश्या सूचना केल्या. ना. श्री. मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला व चर्चा केली. 
चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आल्यामुळे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवरचे छत उडाले, झाडे पडली, वस्त्यांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरले, विजेच्या तारा तुटल्या. गावांमध्ये विजेचे ट्रान्सफॉर्मर निकामी झाले आणि शेतांमधील कृषीपंपांचे खांबही पडले. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. या एकूणच जील्ह्यातील परिस्थितीची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 
जिल्हाधिकारी,तहसीलदार, मदत पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे भेट घेत नुकसाभरपाईची देण्यासंदर्भात जे शासन निर्णय अस्तित्वात आहेत त्यात काही सुधारणा अपेक्षित असतील जेणे करुन भरीव मदत मिळेल तर त्या सुधारणा त्वरित सुचवाव्या अश्या सूचना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.