रुग्णसेवेचे कार्य आयुष्यात सर्वोपरी : ना.सुधीर मुनगंटीवार

'अध्यात्म देते रुग्णसेवेची शिकवण’ .. दुर्गापूर येथे निःशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन .!

चंद्रपूर (वि .प्र.) : माणूस कितीही मोठा धनवान असू देत, ताप आल्यावर अन्न सुद्धा कडू लागतं. नोटा आणि सोने पुढे ठेवले म्हणजे प्रकृती बरी होत नाही. त्यासाठी प्रकृती ठणठणीत ठेवण्याशिवाय पर्याय नाही.आरोग्य सुदृढ ठेवायला अशी शिबिरे आणि डॉक्टरांचे मार्गदर्शनच महत्वाचे आहे. आपले अध्यात्म आणि हिंदूंचा सेवा धर्म आपल्याला रुग्ण सेवेचीच शिकवण देतो. त्यामुळे आयुष्यात रुग्णसेवेचे कार्य सर्वोपरी आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवारी ) केले.
दुर्गापूर येथील सेंटमेरी हायस्कुल येथे निःशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलते होते. व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कटरे, आशा हॉस्पिटलचे डॉ. सौरव अग्रवाल, ओसेसर कँसर हॉस्पिटलचे डॉ. भोयर, शंकरा सुपर हॉस्पिटलचे डॉ. जितेंद्र यादव, आशा हॉस्पिटलचे जयहरी सिंग ठाकूर, फारमेल अकादमीचे प्रिन्सिपल फादर जॉयसेन, सेंट मेरीच्या सिस्टर टॉम्सी, वैद्यकीय अधिकारी कोमल मुनेश्वर यांच्यासह रामपाल सिंग, हनुमान काकडे, अनिता भोयर, केमा रायपुरे, रोशनी खान, सर्व माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, शासकीय कर्मचारी, पक्षाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.  
आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर मिळणारा आनंद कुठल्याही आनंदापेक्षा मोठा आहे. रुग्णांद्वारे मिळणाऱ्या आशिर्वादातून जन्मोजन्मीची शक्ती प्राप्त होते. रुग्णसेवेचे हे पुण्य पुढचे अनेक जन्म कामी येईल, अशी भावनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 
‘राजकारणामध्ये हमारी मांगे पुरी करो, आगे बढो, पीछे हटो हे सुरूच राहणार. परंतु, जातीच्या, वंशाच्या, रंगाच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवा केल्यास त्याचे कायम स्मरण राहते. ही सेवा आपल्या आयुष्यात बोनस पॉईंट ठरते. अशा सेवेसाठी आम्ही कायम पुढे असतो. या मतदारसंघात आरोग्य शिबीर, दिव्यांगांसाठी कार्यक्रम, गोर गरिबांची सेवा सातत्याने सुरु असते. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदानही मी दुप्पट केले आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राज्यातील २ कोटी ४८ लाख माता-भगिनींच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा होत आहेत. या बहिणींची, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून उत्पन्नाची अट देखील नाही. जीवनदायी योजनेमध्ये त्यांचा खर्च उचलण्याचा संकल्प आपण केला. शासनाच्या अशा कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील 'स्त्री'ला कुणासमोर हात पसरायची वेळ आता येणार नाही. ती हिमतीने समाजात उभी राहू शकेल. आम्ही कधी, जाती, धर्म वंश पहिला नाही. आपला धर्म हा मानवतेचा धर्म असला पाहिजे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.


जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय :

जिल्हात आपण १४० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारत असून याचा उपयोग जिल्ह्यातील रुग्णांना होईल. एक धर्मशाळा देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. केवळ चंद्रपूर नव्हे तर परिसरातील प्रत्येकाला हे आरोग्य मंदिर वाटेल, अशी त्या मागची संकल्पना आहे, असेही ते म्हणाले. 

दिव्यांग, नेत्र रुग्णांची सेवा :

मनापासून सेवा करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.परिवारातील सदस्यांप्रमाणे रुग्णांची सेवा करत आहे या बद्दल ना.मुनगंटीवार यांनी स्वयंसेवक,कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यापूर्वी,नेत्र चिकित्सा शिबिरातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू ऑपरेशन केले. ३५ हजारांहून अधिक जास्त चष्मे दिले, असेही ते आवर्जून म्हणाले.

मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया :

लहान मुलांच्या हृदय शास्त्रक्रियेकरिता खाजगी रुग्णालयात १० लाख रुपये लागत असताना या शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलच्या चमूद्वारे मोफत करून देण्यात आल्या. २ ते १० वर्षांपर्यंतच्या ६० लहान मुलांचे ऑपरेशन करण्यात आले, याचाही त्यांनी उल्लेख केला. ऑपरेशननंतर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देणारा होता.अशी भावनाही ना.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.