ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास .. बल्लारपुरात सर्व धर्मीयांसाठी ‘भारत माता’ सभागृहाची होणार निर्मिती .!
बल्लारपूर (का.प्र.) - बल्लारपूर शहरात विविध जाती, धर्म व पंथाचे लोक वास्तव्यास आहेत. समाजात ऐक्य, शांतता आणि परस्पर बंधूभाव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मागील अनेक वर्षांपासून जनसेवेचे व्रत हाती घेतले असून जात, पात, धर्म, वंश न पाहता सर्वसामान्य व कष्टकऱ्यांची सेवा करणे हा भाव मनात ठेवून कार्य केले आहे. बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासाकरीता सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सर्वधर्म समभाव ठेवून एकत्रित येऊन कार्य केल्यास जिल्ह्याच्या तसेच देशाच्या प्रगतीत हातभार लागेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.बल्लारपूरात सर्व धर्मीयांचे एकत्रीकरण व्हावे, या उद्देशाने "भारत माता" सभागृहाची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
बल्लारपूर येथे आयोजित सर्वधर्म सद्भावना कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला भंतेजी भिख्खू खेमाजी, जगदीश सिंग, तिरलोक सिंग ग्यानीजी, पास्टर गोपाल अटकुरे, राकेशजी पांडे, अहमद रजा नूरानीजी, रविश सिंग, साजिद कुरेशी तसेच सर्वधर्मीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राजनीतीपेक्षाही मोठी राष्ट्रनिती आणि देशनिती आहे, असे सांगून ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मागील अनेक वर्षांपासून जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर, नांदेडमधील गुरुद्वारा तसेच नागपूरमधील ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्याकरिता निधी उपलब्ध करून दिला. मानवता हाच खरा धर्म आहे. मानवता धर्म पाळत विकासाचे राजकारण केले. जिल्ह्यातील टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल हे कोणत्या विशेष जाती, धर्मासाठी नव्हे तर सर्व धर्मियांसाठी उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारा प्रत्येक धर्माचा व्यक्ती चेहऱ्यावर आनंद व समाधान घेऊन जाईल.’
जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठांची निर्मिती करण्यात येत आहे. सर्व जाती, धर्मातील विद्यार्थींनीना कौशल्य प्रशिक्षणासाठी एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या उपकेंद्राची निर्मिती केली जात आहे. या विद्यापीठातून ज्ञान प्राप्त करताना आकाशाला गवसणी घालण्याचा संकल्प येथील सर्वधर्मीय विद्यार्थींनी करतील, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या जिल्ह्याच्या तसेच मतदारसंघाच्या विकासाकरिता कृषी महाविद्यालय, बसस्थानके, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कार्पेट युनिट, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, सिमेंट रोड तसेच पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना निर्माण करण्यात आल्या आहेत, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘पुढील पाच वर्षांकरिता अनेक महत्त्वपूर्ण निर्णय करण्यात आले आहेत. येत्या मार्चमध्ये जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अॅडव्हांटेज चंद्रपूरच्या माध्यमातून 75 हजार कोटींची गुंतवणूक उद्योगांमध्ये होत आहे. पोंभुर्ण्यामध्ये 5 हजार एकरवर लक्ष्मी मित्तल ग्रुप 40 हजार कोटींची गुंतवणूक करणार असून आशियातील सर्वात मोठा उद्योग पोंभुर्ण्यामध्ये उभा राहील. येत्या पाच वर्षात या जिल्ह्यातील तसेच मतदारसंघातील तरुण रोजगारक्षम बनेल, यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
बल्लारपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामांची चर्चा देशभरात होत आहे. विकास कामांच्या बाबतीत बल्लारपूर मतदारसंघ देशात आदर्श बनेल, असा विश्वास व्यक्त करत हा जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी केला. येत्या पाच वर्षात येथील गोरगरिब व कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणार असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले.
उद्योगांची पायाभरणी :
माझ्या आमदारकी आणि मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात विविध उद्योग आणले. चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन येथे आठवा व नववा संच उभारणीचे कार्य केले. 2009 पूर्वी मुल एम.आय.डी.सी.मध्ये एक साधा उद्योग देखील नव्हता. त्यानंतर विविध उद्योग मुल एम.आय.डी.सी.मध्ये आले. यामध्ये, कार्निव्हल इंडस्ट्रीज प्रा.लि. ने 176 कोटी 50 लक्ष रुपयाची गुंतवणूक केली. तालुक्यातील 425 नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला. दीनानाथ अलाईड स्टील कंपनीची 160 कोटी रुपयांची गुंतवणूक असून 100 जणांना रोजगार, जी.आर कृष्णा फेरो अॅलाय प्रा. लि. कंपनीची 740 कोटींची गुंतवणूक असून 700 जणांना रोजगार, भाग्यलक्ष्मी मेटल प्रा. लि. कंपनीची 452 कोटींची गुंतवणूक असून 750 जणांना रोजगार तसेच सॉईल अँड स्टील प्रा. लि.पृथ्वी अलाॅय प्रा. लि., अंबा आयर्न अँड स्टील कंपनी लि., सिद्धबली इस्पात लि., राजुरी स्टील प्रा. लि., ग्रेटा एनर्जी प्रा. लि.आदी उद्योग उभारण्यात आले आहे. असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.