बल्लारपूर पेपर मिल मजदूर संघाच्या वर्धापन दिनाला संबोधन .!
बल्लारपूर (का.प्र.) : बल्लारपूर पेपर मिल शहराच्या रोजगाराचा पाया आहे. पेपर मिलला आजवर अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. सरकारच्या माध्यमातून आवश्यक मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. येथील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील, असा शब्द राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
बल्लारपूर पेपर मिल मजदूर संघाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ना. श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘बल्लारपूर पेपर मिल मजदूर संघाचा 71 वा वर्धापन दिन साजरा होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. माजी खासदार श्री.नरेशबाबू पुगलिया 41 वर्ष या कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. जेव्हा एखादा नेता कामगार संघटनेला आपले कुटुंब समजून काम करतो, तेव्हा कामगारांना मोठा आधार मिळतो. कामगार संघटनेचे नेतृत्व करताना कामगारांचा विश्वास जपत 41 वर्ष सातत्याने काम करणे कठीण कार्य आहे. नरेशबाबूंनी आपल्या कर्तुत्वाने कामगारांचे मन जिंकत कामगारांचे शोषण दूर करुन त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.’
पुढे म्हणाले, 1953 मध्ये बल्लारपूर पेपर मिलची स्थापना झाली आणि त्याचवर्षी 23 जुलैला बल्लारपूर पेपर मिल मजदूर संघाची स्थापना करण्यात आली, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘या पेपर मिलने अनेक कुटुंबांना आधार दिला. तर पेपर मिलला माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी आधार दिला आहे असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.