ना.सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेतील मुसंडी राज्यात लक्षवेधक .!

सलग सातव्यांदा विधानसभेत जाणारे विदर्भातील पहिले नेते .!

बल्लारपुर (का.प्र.) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लक्षात राहील अशी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य  व मत्स्त्यव्यसाय मंत्री आणि चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा तर जिल्ह्यातून सलग सातव्यांदा दणदणीत विजय मिळवला.
शनिवारी (23 नोव्हेंबर) लागलेल्या निकालाने भल्याभल्या राजकीय पंडीतांचे अंदाज चुकवून टाकले. जवळपास सर्व एक्झीट पोलवाल्यांनी मतमोजणी सुरू असताना तोंडात बोटे घातली. राज्यभर महायुतीची त्सुनामी आली. महाविकास आघाडीसह इतर लहान मोठे पक्ष त्यात अक्षरशः वाहून गेले. यामध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली. येथून सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला. 
सलग सातव्यांदा आमदार होणारे मुनगंटीवार विदर्भातील पहिले नेते ठरले आहेत. हा विक्रम काल त्यांनी आपल्या नावावर नोंदवला. महाराष्ट्राच्या राजकारणात विक्रमादित्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुनगंटीवार यांच्या नावे यापूर्वीही अनेक विक्रम आहेत. 50 कोटी वृक्ष लागवड, चार लिम्का रेकॉर्ड, दोन गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लक्षावधी दिव्यांनी 'सियावर रामचंद्र की जय' ही अक्षर साकारल्याबद्दल तसेच ग्रीन भारत माता  साकारल्याबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही त्यांनी मिळवले आहेत. 


विक्रमी वृक्ष लागवडीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 'मन की बात' कार्यक्रमात त्यांचे विशेष कौतुक झाले आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्री कार्यालयाला देशातील पहिला आयएसओ पुरस्कार मिळालेला आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी 'बेस्ट फायनान्स मिनीस्टर इन इंडिया' हा पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. स्व. अरुण जेटली यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. स्वातंत्र्यानंतर 11 हजार 975 कोटी महसुली आधिक्य असलेला अर्थसंकल्प केवळ मुंनटीवार यांनी दिला होता. देशातील कोणत्याही अर्थमंत्र्याला हे शक्य झालं नव्हतं, ते मुनगंटीवार यांनी करून दाखवलं. त्यांना गोंडवाणा विद्यापीठातर्फे नुकतीच डीलीट पदवीही प्रदान करण्यात आली आहे. 
सन 1995 पासून सलग सातव्यांदा विधानसभेत निवडून जाणारे मुनगंटीवार हे विदर्भातील पहिले नेते आहेत. विकासाची दृष्टी असलेला हेवीवेट नेता म्हणून अख्खा महाराष्ट्र आज त्यांच्याकडे पाहतो. आजवर मंत्री म्हणून ज्या-ज्या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आली, त्यावर आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप त्यांनी उमटवली. त्यामुळे 'विकासपुरूष', 'दिला शब्द केला पूर्ण' ही बिरूद त्यांना लागली. विकासकामे हे त्यांच्या या यशाचे गमक आहे.






Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.