विसापूरला विकसित करण्यासाठी पूर्ण शक्तिनिशी प्रयत्न करणार .!

चंद्रपूर (वि.प्र.) : विसापूरमध्ये ‘न भुतो न भविष्यती’ अशी विकासकामे केली. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल टाकले. आता पुन्हा एकदा विसापूरकरवासियांचा मतरुपी आशीर्वाद मिळाला तर अतिक्रमण धारकांना पट्टे, शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते, धोबी समाजासाठी सभागृह, भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने सभागृह व भव्य पुतळा, मातंग, चर्मकार व गाडी लोहार समाजासाठी सभागृह येत्या काळात करण्यात येईल. विसापूरला विकसित करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करेन, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
विसापूर येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘पहिल्यांदा आमदार झाल्यावर विसापूरमध्ये वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, रेल्वे प्लॅटफाॅर्म, सामाजिक सभागृहाचे बांधकाम केले. विसापूर गावाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी तत्परतेने कामे केली. आरोग्य शिबिरे, नेत्रचिकित्सा, तसेच मोतीबिंदूचे ऑपरेशन केलीत. या गावातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांची सेवा केली.’ 
मी अर्थमंत्री असताना लंडनमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक केले. रमाई घरकुल  योजनेचे अनुदान 2.50 लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय केला. जिल्ह्यातील 4 लाख 72 हजार बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे आले. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णयदेखील आता घेण्यात आला आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.  

जाती-पातीच्या राजकारणाला बळी पडू नका :

एखाद्या गावात विकासकामे न पाहता जातीच्या आधारावर मतदान झाले तर त्या गावाचे भविष्य कोणीही सुधारु शकत नाही. जातपातीमुळे विकासाची गाडी कायमची प्लॅटफाॅर्मवरच थांबून राहील. जाती-धर्माचा विचार न करता मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब माझे कुंटूंब आहे या भावनेने सर्वांच्या पाठिशी उभा राहिलो. गावातील लोकांच्या मागणीनुसार सर्व कामे पूर्णत्वास नेली. प्रत्येक वार्डात पाण्याच्या बोरींग दिल्या. विसापूर ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम पुर्ण केले. त्यामुळे जाती-पातीच्या राजकारणाला बळी न पडता विकासाला मतदान करा, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

काँग्रेसने अपप्रचार करुन मते बळकावली :

70 वर्षे काँग्रेसने देशाला फसवले. काँग्रेसवाले मी या मतदारसंघात केलेल्या विकासकामांमध्ये उणीवा काढतात. मात्र, राज्यात 2 वर्ष 8 महिने काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी कोणता विकास केला, हे सांगत नाहीत. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘काँग्रेस हे जळते घर आहे’. आरक्षणाला धक्का लावण्याचे पाप काँग्रेसने केले. जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम होते, त्यामुळे आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी संविधान हातात घेऊन शपथ घेतली नाही. मात्र, आता काश्मीरमधल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा संविधान हातात घेऊन शपथ घ्यावी लागते. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी महायुती सरकारची असल्याचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.