विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित .. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता .!
घुग्घुस (वि.प्र.) : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी २६ हजार मतांनी विजयी झालो. विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही माझी सातवी वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी चार आमदार असे आहेत जे आठवेळा निवडून आले आहेत. आणि तीन आमदार असे आहेत जे सातवेळा विजयी झाले आहेत. त्यातला मी देखील एक आहे. पण हे यश माझे नाही, माझ्या कार्यकर्त्यांचे आहे. कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. ते आमच्यापेक्षा जास्त काम करतात. घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात. त्यामुळे ‘बाजीगर’ होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करताना आनंद होत आहे, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सत्काराला उत्तर दिले.
घुग्घुस येथे आ. श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे आणि आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी सत्काराला उत्तर दिले. आठवडी बाजार घुग्घुस येथील स्व. प्रमोद महाजन रंगमंचावर आयोजित या सोहळ्याला आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोरगेवार, महानगराचे अध्यक्ष राहूल पावडे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, महीला प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम आदि नागरीक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काही ठिकाणी संघर्ष बघायला मिळाला. पण कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा आत्मविश्वास असेल तर जगातील कुठलीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही, या शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
महायुतीला या निवडणुकीत जनतेने व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिला. या यशात सर्वांत मोठा वाटा लाडक्या बहिणींचा आहे. आम्हाला बहिणींनी भाऊबिजेचे रिटर्न गिफ्ट दिले, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत तर घुग्घुसच्या जनतेने प्रेम दिलेच याचा उल्लेख आ. श्री. मुनगंटीवार यांनी केला. सत्कार सोहळ्याच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी विवेक बोढे व त्यांच्या टीमचेही श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले.
देवराव भोंगळे व किशोर जोरगेवार हे त्यांच्या मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी काम करतील, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या निवडणुका आपण जिंकणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
१६ मार्च १९९५ मध्ये घुग्घुसने माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून दिली. याच गावातील जनतेने मला निवडून दिलं नसतं तर देशामध्ये आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढविणारी कामे करू शकलो नसतो. पक्षाने संधी दिली, पण लोकांनीही संधी दिली, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला. घुग्घुसच्या विकासासाठी मी कायम सोबत आहे. आमच्यावर लोकांनी प्रेम केले आहे. त्याचे ऋण विकासकामे करूनच फेडण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आज आमचा सत्कार नसून भविष्याच्या झंझावाती विकासकामांची ऊर्जा आहे, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
धुकं कायमस्वरुपी नसतात :
आम्हाला सत्तेची भूक नाही, आम्हाला विकासाची भूक आहे. पदाचीही भूक नाही. मी पदाची चिंताही केली नाही, याचाही त्यांनी उल्लेख केला. आज मुंबईहून नागपूरला विमानाने निघालो, पण विमान नागपुरात उतरलेच नाही. कारण नागपूरच्या आकाशात धुकं होते. शेवटी विमान हैदराबादला उतरले. एक तासाने वातावरण चांगले झाले आणि आम्ही नागपूरच्या विमानतळावर उतरू शकलो. आयुष्याचे असेच असते. काही क्षण धुकं येतात, पण ते कायमस्वरुपी नसतात. पुन्हा आपले विमान उतरणार, हे निश्चित असते.
भाग्यवान चंद्रपूर जिल्हा :
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जगातील कोणत्याही भक्ताला माझ्या जिल्ह्यातील सागवनाने तयार झालेल्या दरवाज्यातूनच जावे लागते. देशातील कोणत्याही खासदाराला आम्ही तयार केलेल्या दरवाज्यातूनच संसदेत प्रवेश करावा लागतो. पीएमओमधील पंतप्रधानांची खूर्ची देखील आम्हीच तयार केली आहे. असा भाग्यवान आमचा जिल्हा आहे,असे आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.