आज विधानसभा सदस्य म्हणून मी सातव्यांदा शपथ घेतोय. या क्षणी ज्या भावना माझ्या मनात दाटून आल्यात त्या व्यक्त करताना मला शब्द अपुरे पडत आहेत. 1995 ते 2024 या तीस वर्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून दीर्घ प्रवास मी अनुभवलाय तो केवळ जनता जनार्दनाच्या प्रेमाच्या आणि आशिर्वादामुळे. आज या शुभक्षणी मला आठवण येतेय ती माझ्या दिवंगत आईवडिलांची. माझी पत्नी, मुलगी, जावई यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हा प्रवास यशस्वी झाला. जनतेच्या आशिर्वादाच्या प्रेमाच्या आणि बळावर मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष, मंत्री झालो, अनेक प्रतिष्ठेचे सन्मान मला मिळाले, अनेक आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यात आले. दुःखद क्षणी जनतेचा भावनिक आधार देखील मी अनुभवला. या क्षणी जनता जनार्दनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे क्रमप्राप्त आहे. मी त्यांच्या प्रेमाला कधीही उतराई होणार नाही. या प्रवासात माझे पक्षश्रेष्ठी, पक्षातले सहकारी, भाजपा व मित्रपक्षातले पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो.
सर्वांचे प्रेम, आपुलकी यांच्या ऋणात सदैव राहणे मला आवडेल. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत असले तरी या चार ओळी सर्वाना समर्पित करतो...
या आपुलकीच्या अपुल्या
कसे मोल करावे कुणी
मी मनात ठेवीन माझ्या
अन सदैव राहील ऋणी
सदैव आपला - सुधीर मुनगंटीवार