देवाने निर्मिली ही क्षिति! तिचे उदरी खाणी किती? परि माऊली जैसी प्रेमळ ! दीप्ती कोठेच नाही ,! याच गुणे मातृदेवो भव:! वेदाने आरंभीच केला गौरव! नररत्नांची खाण अपूर्व! मातृ जाती म्हणोनिया ! अशा सर्व स्त्री म्हणून जन्मलेल्या रत्नांना जागतिक महिला दिनानिमित्त भरभरून शुभेच्छा,प्राचीन काळापासून ते आजपर्यंतचा इतिहास आपण नेहमीच ऐकतो आणि वाचतो. बुद्धीवादी, वेदवादी मैत्रेयी, गार्गी ते रणचंडिका ताराबाई, जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, विचार आणि शिक्षणाची प्रेरणा जाणीवपूर्वक रुजवणाऱ्या सावित्रीबाई, स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिनी, सुनिता विल्यम्स, कल्पना चावला, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ ते आजच्या सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु पर्यंत नारी ही अबला नाही, तर सबलाच होती, आहे आणि राहणार.
खरं तर आपली समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था यावरच त्याची जडणघडण अवलंबून आहे. कारण तीही मानव म्हणूनच जन्माला येते आणि बालपणापासूनच तिला जसं घडविल्या जाते, तशीच ती घडत जाते. स्त्रिया हा सर्व क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेचा सार्थ असा ठसा उमटवत नावलौकिक करतात. नोकरी करूनही घर आणि मुलांचा सांभाळ करतात, त्यांच्या आवडीनिवडी ही जपतात. अशावेळी स्वतःकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष करतात, अनेकदा तर आजारी असूनही त्यांना सण- समारंभ व्यवस्थित पार पाडण्यातच महिलांना सार्थकता वाटते. तसंच आमच्या गृहदक्षिणींना प्रत्येक कामात उत्कृष्टता, स्वच्छता हवीच असते. त्यासाठी त्या सतत कार्यशील असतात, आणि यामुळेच त्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताण ओढवून घेतात. हाच ताण निवारण्यासाठी प्रत्येक स्त्रीला दिवसातून काही वेळ तरी हा स्वतःला द्यायला हवा. आपली एखादी तरी आवड ही जपायलाच हवी. त्यातूनच जगण्यासाठी नवीन उमेद आणि उत्साह वाढतो. अति विचार करणे ही स्त्रियांची फार जुनी सवयच आहे. त्यातूनच चांगले विचार घेऊन, वाईट विचार सोडून द्यायचे असतात. नुसताच विचार करण्यापेक्षा कृतिशील विचारातून, कृतीयुक्त वर्तन घडू दिलं तर यावर्षीची जागतिक महिला दिन २०२५ ची संकल्पना सार्थकी ठरेल.म्हणूनच म्हणते," खेचून आण त्या यशाला, मागे वळून बघू नको! संघर्षावर मात कर, टाळाटाळ करू नको! वादळातून वाट शोध, कर स्वतःला सामर्थ्यवान, वाचवायला येईल तारण हार, वाट त्याची पाहू नको! बदल आधी स्वतःला, जग बदलेल, समाज बदलेल याची वाट पाहू नको! "
आजच्या वर्तमान परिस्थितीत वर्तमानपत्रातून व बातम्यांमधून मन सुन्न करणाऱ्या घटना वाचायला आणि ऐकायला येतात. यावर खरच चिंतन करण्याची गरज आहे. प्रत्येकाने नुसतेच महिला दिनाचे कार्यक्रम साजरे करण्यापेक्षा, आपल्या घरातील आणि समाजातील स्त्रियांना सन्मान आणि आदर द्यायला हवा. तेव्हाच प्रत्येक महिलेला आपण आपल्याच घरात उपेक्षित असल्याची सल मनाला बोचणार नाही. काही स्त्रियांच्या ललाटी लवकरच वैधव्य आलेलं असते, अशा परिस्थितीतही स्त्रियांनी न डगमगता, आपली जबाबदारी न झटकता, कित्येक संघर्षांना तोंड देत मुलांचे शिक्षण, संस्कार आणि घर या जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे सांभाळतात... त्यांना माझा मानाचा मुजरा. मैत्रिणींनो आजच्या पिढी बद्दल सांगायचे झाल्यास ती बऱ्याच प्रमाणात स्वतंत्र आहे, पण आपल्याला हे स्वातंत्र्य अथक परिश्रमातून मिळालेले आहे, याचा विसर पडता कामा नये. या स्वतंत्रतेचा वापर स्वअध्ययन करून, उन्मत्त न होता, स्वउन्नतीसाठी कसा करता येईल, याचा विचार नक्कीच करायला हवा, एवढेच! सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
सौ.केशनी ज्ञानेश हटवार भद्रावती ..
