चंद्रपूर (वि.प्र.) - भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील स्थापना दिनानिमित्त माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी केलेल्या विधानाने नवा वाद पेटला आहे. “पक्ष संघटना मजबूत करा, आपल्या पक्षाची काँग्रेस झाल्यासारखे वागू नका” असे सांगताना त्यांनी पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांवर अप्रत्यक्ष टोला मारल्याचा आरोप होत आहे. मात्र, त्यांच्या स्वतःच्या गेल्या पंधरा वर्षांच्या वागणुकीकडे पाहता त्यांनीच काँग्रेससदृश वर्तन केल्याचे अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे. स्वपक्षीय नेत्यांबद्दल त्यांनी केलेल्या विधानाचा आता लोक चांगलाच समाचार घेत आहेत.
शोभा फडणवीस दीर्घ काळापासून सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात कार्यरत आहेत, हे आता गुपित राहिलेले नाही. त्यांना मंत्रीमंडळात जाऊ न देण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे, अशी जोरदार चर्चा पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बल्लारपूर विधानसभेतील मुल येथे वास्तव्यास असलेल्या शोभा फडणविसांनी भाजपाच्या उमेदवारांसाठी मतदारसंघात किती प्रचार केला हे त्यांनी दाखवावे? मागील पंधरा वर्षांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी एकही सभा घेतलेली नाही. शिवाय कोणत्याच भाजपाच्या नेत्याला निवडून देण्यासाठी त्यांनी प्रचार केला नाही. त्यामुळे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी शोभा फडणविसांची भूमिका असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्ते देत आहेत.
इतकेच नाही, तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराविरोधात संतोष रावत काँग्रेसकडून लढले होते. बँकेतील घोटाळ्यावरून रावत यांच्यावर एसआयटी चौकशी लागू नये, यासाठी शोभा फडणवीस यांनी काँग्रेसला मदत केल्याचे गंभीर आरोप होत आहेत. पक्षाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या – हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार – निवडणुकीतही त्यांनी कोणताही प्रचार केला नव्हता, हे त्यांच्या निष्ठेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.
"शोभा फडणवीस यांची भूमिका म्हणजे ‘पुतना मावशी’सारखी – वरवर प्रेमळ पण आतून विषारी," असा थेट आरोप आता स्थानिक पातळीवरून केला जात आहे. अशा लोकांनी पक्षाचे ‘काँग्रेसीकरण’ थांबवा, असे सांगणे म्हणजे धूळफेक करण्यासारखे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, पक्षात राहूनच पक्षाची मुळे पोखरणाऱ्या अशा नेत्यांवर कारवाई केली जाणार का? की हे वर्तन डावलून पुन्हा पक्ष संघटनेच्या नावाखाली पक्षनिष्ठांच्या बलिदानावर पाणी फिरवले जाणार? असा सवाल उपस्थित होत आहे.