बल्लारपुर (का.प्र.) : मराठी चित्रपटसृष्टी ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. एक काळ होता, जेव्हा संकटात सापडलेल्या या सृष्टीला बळ दिलं ते तुमच्या लेखणीने. पत्रकारिता ही केवळ वृत्त देण्याचं माध्यम नसून, जनतेच्या भावना आणि कलाकारांच्या संघर्षाचा आरसा असते. आणि मराठी पत्रकारितेने हे कार्य गेल्या अनेक दशकांत अत्यंत जबाबदारीने पार पाडलं आहे.
आज मात्र परिस्थिती बदलली आहे. प्रसारमाध्यमं अधिक व्यावसायिक झाली आहेत. पॅकेजिंग, टीआरपी आणि व्यावसायिक दबाव यामुळे खरी परिस्थिती मागे पडतेय. मराठी चित्रपट आजही आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतो आहे. निर्मात्यांकडे ना खरेदीदार आहेत, ना थिएटरमध्ये पुरेशी संधी. अनेक चांगले चित्रपट फक्त प्रदर्शनाअभावी अंधारात गडप होत आहेत.
आजचा निर्माता सत्याने शासनाच्या निर्णयांसमोर अडून उभा आहे. कोविड काळात मराठी चित्रपट निर्माता सोडून इतर सर्व घटकांना सरकारने मदत केली. पण जो निर्माता स्वतः निर्मिती करून इतर घटकांचे पालनपोषण करतो, त्यालाच सहाय्य नाकारलं गेलं. यामागे सांकृतिक सचिवांची अपरिपक्वता जबाबदार आहे.
या व्यवस्थेचा परिणाम म्हणून, आज आम्ही आमचे एक मूल्यवान रत्न गमावलं – आशिष, जो सांस्कृतिक मंत्री ना राहता सचिव आणि फिल्मसिटीच्या संचालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे आपले प्राण गमावून बसला. तो केवळ एक निर्माता नव्हता, तर उत्तम निर्मितीमूल्य जपणारा, चित्रपटसृष्टीत जीव ओतणारा कलाकार होता.
तुम्ही या सृष्टीचे जुने साक्षीदार आहात. आजही जनतेचा तुमच्यावर अपार विश्वास आहे. म्हणूनच, आम्ही तुम्हाला ही विनंती करतो – पुन्हा एकदा मराठी चित्रपटाच्या बाजूने आवाज उठवा. या सृष्टीचे प्रश्न, तिच्या अडचणी, आणि तिचा खरा चेहरा समाजासमोर मांडण्यासाठी तुमची लेखणी गरजेची आहे.
मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी तुमचा भूतकाळासारखाच ठाम, निर्भीड आणि वास्तववादी साथ अपेक्षित आहे.
देवेंद्र मोरे ..
(अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ) www.nirmatamahamandal.com