अरबिंदो कंपनीच्या विविध समस्यांवर भद्रावती तहसील कार्यालयात आढावा बैठक .!

रोजगार, पिण्याचे पाणी, पर्यावरणसंरक्षणासह स्थानिकांना प्राधान्य द्या - आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट निर्देश .. प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी आमदार मुनगंटीवार यांची ठाम भूमिका .!

चंद्रपूर (वि.प्र.) : भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रिअ‍ॅलिटी अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या टाकळी, जेना आणि बेलोरा येथील कोळसा खाणींमध्ये कार्यरत एसआयएस सिक्युरिटी कंपनीकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज ठेंगणे यांनी आमरण उपोषण केले होते. हा संघर्ष शेतकरी व ग्रामस्थांच्या न्यायहक्कासाठी होता. या मागण्यांबाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते.याच पार्श्वभूमीवर आज (दि. 17) भद्रावती तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत रोजगार, पिण्याचे पाणी, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांना प्राधान्य यावर चर्चा झाली. यावेळी संबंधित कंपनीला स्पष्ट निर्देश राज्याचे माजी वने व सांस्कृतीक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
बैठकीला आमदार करण देवतळे,माजी जिल्हाध्यक्ष महानगराचे राहुल पावडे, माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे, तहसिलदार श्री. भांडारकर, उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन) अतुल जटाळे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, प्रवीण ठेंगणे, सरपंच प्रभाताई बोढाले, प्रदीप महाकुलकर, पोलीस पाटील हेमंत धानोरकर, उपसरपंच हरिश्चंद्र आसुटकर, श्रीकृष्ण आगलावे, तनूज पंडिले, सुरेश देहारकर, मनोज मत्ते, प्रज्वलंत कडू, सुरज पेद्दूलवार, नम्रता ठेमस्कर आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बेलोरा येथील आराध्य दैवत असलेल्या भंगाराम मंदिराचे स्थलांतर केवळ पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच करण्यात येईल, असे आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत सदर मंदिर हटविण्यात येणार नाही. कंपनीने प्रकल्पग्रस्त किलोनी, बेलोरा, जेना, पानवडाळा, टाकळी, कानसा आणि डोंगरगाव या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी 17 जुलैपर्यंत (1 महिन्यांच्या आत) आरो मशीन बसविण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. अरविंदो कोलमाईन्स कंपनीने पाटबंधारे, सिंचन तसेच पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेलोरा नाला बंद केला आहे. तसेच, किलोनी, बेलोरा आणि जेना गावाकडे जाणारा रस्ता कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला आहे. या प्रकाराची योग्य माहिती घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

जमीन खरेदीत कंपनीची ढिसाळ भूमिका:

कंपनीने नियमानुसार प्रति महिन्याला 125 एकर जमीन खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र, तीन महिने लोटूनही कंपनी प्रशासनामार्फत कोणतीही जमीन खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकूण 375 एकर जमीन तीन महिन्यांच्या आत खरेदी करणे आवश्यक आहे. यापैकी 110 एकर जमीन येत्या 30 जूनपर्यंत खरेदी केली जाईल, असे कंपनी प्रशासनाने सांगितले आहे. कंपनीला माईन्स दिल्यानंतर प्राप्त होणाऱ्या ग्रेड कोल व रॉयल्टी आणि सध्या दिल्या जाणाऱ्या कोलमाईन्समधील आताचा ग्रेड कोल व रॉयल्टी यामधील फरक किती आहे, याबाबत सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच कंपनीतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याचा तपासणी अहवाल, तसेच हे पाणी जमिनीत गेल्यानंतर होणारे पर्यावरणीय व कृषी नुकसान याबाबतची माहिती देखील सादर करण्यात यावी, असे निर्देश देखील आ. मुनगंटीवार यांनी दिले.  

स्थानिकांना प्राधान्य देण्याचे निर्देश:

अरबिंदो कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या कामगारांची माहिती कामगार विभागामार्फत घेण्यात यावी.  कंपनीने भूसंपादनासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करावे. अरबिंदो कंपनीमध्ये विशेषतः भद्रावती तालुक्यातील स्थानिक नागरिकांना स्थायी स्वरूपात रोजगाराची संधी देण्यात यावी, तसेच सुरक्षारक्षक पदांसाठी स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे. माजी सैनिकांना सुरक्षा रक्षक पदासाठी दिलेल्या कंत्राटाचा कालावधी 2026 पर्यंत निश्चित करण्यात आला होता, परंतु कंपनी प्रशासनाने ते कंत्राट रद्द केले आहे. त्यामुळे सदर कंत्राट येत्या 26 मेपर्यंत पुन्हा पूर्ववत देण्यात यावे.
कंपनी प्रशासनाने येत्या सात दिवसांच्या आत सुरक्षा रक्षकांना कामावर घेणे आवश्यक आहे. तसेच तहसीलदारांनी नियुक्त केलेले सुरक्षा रक्षक स्थानिक आहेत की नाही, याची तपासणी करावी. सद्यस्थितीत कंपनीमध्ये कार्यरत वाहनचालक हे बाहेर जिल्ह्यातील असून, एकूण 160 कामगार इतर जिल्ह्यांतून आलेले आहेत, याचीही योग्य नोंद घेण्यात यावी. त्यासोबतच कंपनी प्रशासनाने डोजर ड्रायव्हर प्रशिक्षणाबाबत येत्या सात दिवसांत स्पष्ट निर्णय घ्यावा, असे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत कंपनी प्रशासनाला दिलेत.

उपोषणस्थळी दिली होती भेट:

भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रिॲलिटी ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमी. कंपनीच्या टाकळी, जेना, बेलोरा या कोळसा खाणीतील एस.आय.एस सिक्युरिटी कंपनीच्या अन्यायाविरोधात भद्रावती येथे आमरण उपोषण करत असलेले माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली होती. विनंतीचा सन्मान ठेवत त्यांनी आमरण उपोषण तात्काळ मागे घेतले. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या न्यायहक्कासाठी हा लढा असून बैठक घेऊन न्यायमागण्या पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलल्या जाईल असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. त्यासंदर्भात 48 तासाच्या आत तात्काळ बैठक घेऊन स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बैठक घेतली,हे विशेष.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".