आमदार निधी अंतर्गत 21 हातपंप व सोलार पंप बसविण्याकरीता 71.62 लाखांची प्रशासकीय मान्यता .. बल्लारपूर विभानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा .!
चंद्रपूर (वि.प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर कोणतीही समस्या आली, की तिचा ठामपणे पाठपुरावा करून ते नेहमीच ठोस उपाययोजना करतात. समस्या शहरी असो वा ग्रामीण; समाधानकारक मार्ग शोधण्याची आणि जनतेच्या अडचणी दूर करण्याची त्यांची तत्परता नेहमीच अनुभवास येते. आता त्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार निधीतून 21 हातपंप व सोलार पंप बसविण्याच्या कामाला एकूण 71 लक्ष 62 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे मुल, बल्लारपूर, पोंभुर्णा आणि चंद्रपूर तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उन्हाच्या तीव्र तडाख्यात पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये हातपंप व सोलार पंप बसविण्यासाठी पुढाकार घेतला होता. यामुळे ग्रामीण भागातील सोलार पंप लवकरच कार्यान्वित होणार आहेत.
हातपंप बसवण्याची कामे :
या मंजुरीअंतर्गत मुल तालुक्यातील चिचाळा (मो), जुनासुर्ला, भेजगांव, येरगांव/बेलगांव येथे कुणबी समाज मंदिराजवळ, तसेच बल्लारपूर तालुक्यातील श्रीमती सुनीता मातंग यांच्या घराजवळ, पोंभुर्णा तालुक्यातील टोक, गंगापुर चक आणि चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापुर (गणना शहर) येथील वार्ड क्रमांक 4 गोसिया मस्जिद परिसर, भीम नगर येथे हातपंप बसविण्याची कामे करण्यात येणार आहेत. या 11 कामांना एकूण 21 लक्ष 61 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सोलार पंप बसविण्याची कामे :
याशिवाय, बल्लारपूर तालुक्यातील टिळक वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, महात्मा गांधी संकुलाजवळ तसेच मुल तालुक्यातील उश्राळा चक, फिस्कुटी, पोंभुर्णा तालुक्यातील चक ठाणेवासना आणि चंद्रपूर तालुक्यातील चारगाव येथे सोलार पंप बसविण्याच्या 10 कामांना 50 लक्ष 1 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या सर्व कामांसाठी मिळालेल्या मंजुरीचे एकूण मूल्य 71.62 लक्ष रुपये आहे.
या कामांमुळे उन्हाच्या तीव्र तडाख्यात पिण्याच्या पाण्याची वाढती गरज पूर्ण करता येणार आहे. गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल आणि स्वच्छ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.