आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्हा होणार 'हनी हब'!

मांघर गावाला भेट देत चंद्रपूर जिल्ह्यातील ४०प्रशिक्षणार्थींनी घेतला प्रत्यक्ष अनुभव ..आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मानले प्रशिक्षणार्थींनी आभार .!

चंद्रपूर (वि.प्र.) : चंद्रपूर जिल्ह्याला मध उत्पादनाच्या माध्यमातून ‘हनी हब’ बनविण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मधमक्षिका पालनासाठी मामला व पिरली या गावांची ३ जानेवारी २०२४ रोजी ‘मधाचे गाव’ म्हणून घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर सुरू झालेल्या उपक्रमांतून आता प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक टप्पा राबवण्यात येत आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांचे प्रयत्न या क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहेत.
जिल्ह्यातील ४० प्रशिक्षणार्थींनी नुकतीच देशातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांघर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक व्यवस्थापन व ग्रामस्थांकडून वर्षभरात ७ ते ८ हजार किलोपर्यंत होणाऱ्या मध उत्पादनाच्या यशस्वी कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. मधसंचय, प्रक्रियेची शिस्तबद्ध पद्धत, बाजारपेठेचा अभ्यास आणि ग्रामसंघटनात्मक एकात्मतेची उदाहरणे यांचा थेट अनुभव घेत प्रशिक्षणार्थींनी आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली.
यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना CBRTI पुणे आणि मधसंचनालय महाबळेश्वर येथे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. यामध्ये मधमक्षिका पालन, पेटी व्यवस्थापन, किटकनाशकांचा प्रभाव, वनीकरणाशी समन्वय इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी मध उत्पादनाच्या क्षेत्रात नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज होत आहेत. आर्थिक उत्पन्नवाढीचा पूरक मार्ग तयार होत असल्याचे समाधान व्यक्त करत प्रशिक्षणार्थींनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. त्यांच्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवे स्थिर आणि शाश्वत पर्याय उपलब्ध होईल, अशी भावना व्यक्त केली.










Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".