चंद्रपूर (वि.प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून खत टंचाईची समस्या सुटणार असून, शेतकऱ्यांपर्यंत वेळेत खत पोहोचावे यासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतटंचाईची चिंता वाढली आहे. पण आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात HURL कंपनीचे 1250 मेट्रिक टन आणि NBCL (नर्मदा) कंपनीचे 1600 मेट्रिक टन युरिया खत लवकरच उपलब्ध होणार आहे. बल्लारपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन किसान मोर्चाच्या विनंतीनंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यालयात खत उपलब्धतेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली.
बैठकीला कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पवार, बल्लारपूरचे गुणनियंत्रक, तालुका कृषी अधिकारी श्री. गायकवाड, पोंभुर्णाचे गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गवळी, चंद्रपूरच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्रीमती गोडबोले, मूलच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गजभिये, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, भाजपा किसान महानगर मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रवी चहारे आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘युरिया खताचे वाटप काटेकोर नियोजनानुसार प्रत्येक कृषी केंद्रावर तसेच सर्व शेतकऱ्यांपर्यंत खत वेळेत पोहोचेल या दृष्टीने नियोजन करा. याशिवाय प्रशासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर थेट एफ.आय.आर दाखल करावे. दरम्यान, आजच्या तारखेस मूल तालुक्यात फक्त 2.5 टन खत उपलब्ध असून पोंभुर्णा येथे एकही युरियाची बॅग उपलब्ध नाही, ही गंभीर बाब आहे.’
शेतकऱ्यांच्या पिकांच्या हंगामी गरजा लक्षात घेता खत उपलब्धतेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिले.
----------------
शेतकऱ्यांच्या कृषी पंप विज जोडणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार .!
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज जोडणीसंबंधी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करून तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी ओलितासाठी कृषी पंपाच्या विज जोडणीसाठी अर्ज आणि डिमांड रितसर भरली असूनही विज वितरण कंपनीच्या उदासीन धोरणामुळे अनेक अर्ज प्रलंबित आहेत. विज अधिनियम २००३ मधील कलम ४३ (१) नुसार अर्ज केल्यावर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत विज पुरवठा करणे अनिवार्य आहे. तसेच, वेळेत विज पुरवठा न केल्यास कलम ४३ (३) नुसार प्रतिदिवस रु. १,०००/- इतका दंड लागू होतो. विज वितरण कंपनीने सदर अधिनियमाचे पालन न केल्यामुळे, विज अधिनियम २००३ चे कलम १२८ (१), (४) नुसार कंपनीची उच्चस्तरीय चौकशी करून कलम १२८ (६), (ख) नुसार परवाना रद्द करण्याची तरतूद आहे.
शासनाकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून "मागेल त्याला कृषीपंप जोडणी" या धोरणाचा अवलंब करण्यास पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे, कृषी पंप विज जोडणीसाठी अर्ज केलेले अथवा डिमांड भरलेले शेतकरी जे अद्याप विज मिळण्यापासून वंचित आहेत, त्यांनी तत्काळ कागदपत्रांसह माझ्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
या प्रलंबित प्रकरणांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे.सर्व शेतकरी बांधवानी सर्व कागद पत्रासह उपस्थित राहावे
