चंद्रपूर जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली महसूल प्रधान सचिवांची भेट .. कोठारी येथे अतिरिक्त तहसिलदार कार्यालयाच्या पदभरतीची मागणी .. ५२ तलाठी कार्यालयांची कामे पूर्ण करण्यासह महसूल विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गती देण्यासाठी चंद्रपूर दौऱ्याची विनंती ..!
चंद्रपूर (वि.प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांची मुंबई येथे भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित महसूल विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्री ना. श्री. अश्विनी वैष्णव यांना भेटून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध मुद्यांसंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी निवेदन दिले. त्यानंतर आता महसूल प्रश्नांसंदर्भात प्रधान सचिवांची त्यांनी भेट घेतली. यावरून जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांतील प्रश्न निकाली लावण्यासाठी आ. मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
श्री. विकास खारगे यांच्यासोबत झालेल्या भेटीत आ. मुनगंटीवार यांनी कोठारी येथे मंजूर झालेल्या अतिरिक्त तहसिलदार कार्यालयाच्या पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने ही पदभरती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच जिल्ह्यातील ५२ तलाठी कार्यालयांमध्ये सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. नागरिकांच्या दैनंदिन कामासंदर्भात निगडित असलेली ही कार्यालये प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधनसामग्री आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे आ. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
महसूल विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत सखोल आढावा घेण्यासाठी श्री. विकास खारगे यांनी स्वतः चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करावा, अशी विनंतीही आ. मुनगंटीवार यांनी या भेटीत केली. या दौऱ्यात स्थानिक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा होईल व जिल्ह्यातील महसूल विषयक प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या भेटीदरम्यान महसूल विभागाच्या संबंधित विविध विषयांवरही चर्चा झाली.
----------------
मुल तालुक्याला मिळणार अतिवृष्टी व पूरग्रस्त मदतीचा लाभ .!
चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यांबरोबर आता मुल तालुकाही समाविष्ट;प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी शासनादेश सुधारित करण्याचे दिले आश्वासन .. आ.मुनगंटीवार यांचे शेतकऱ्याप्रती संवेदनशीलतेचे पुन्हा दर्शन ..!
चंद्रपूर - राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत व सवलतींचे पॅकेज जाहीर केले. या आदेशात चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुके समाविष्ट करण्यात आले होते; मात्र मुल तालुका यामधून वगळला गेला होता. ही गंभीर बाब लक्षात येताच राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी ही चूक मान्य करत मुल तालुका समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. यामुळे आता मुल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही शासनाच्या विशेष मदत पॅकेजचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार, जुन ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलतींचे पॅकेज देण्यासाठी शासनादेश काढला. या आदेशात चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुके समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, मुल तालुक्याचा या यादीत उल्लेख नव्हता. ही बाब राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सौ. विनिता सिंघल यांच्याशी संपर्क साधला आणि विचारणा केली की “मुल तालुका का वगळण्यात आला?” या विचारणीनंतर प्रधान सचिवांनी ही चूक मान्य केली व तत्काळ मुल तालुक्याचा समावेश सुधारित शासनादेशात करण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.
आ.मुनगंटीवार यांच्या शेतकऱ्याप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे आता मुल तालुक्यालाही या विशेष मदतीचा लाभ मिळणार आहे.शेतकऱ्यांचा आवाज बनून तत्परतेने कार्य करणाऱ्या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेचा व कार्यतत्परतेचा हा आणखी एक प्रत्यय आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या दु:खात सहभागी होऊन त्यांच्या मदतीसाठी शासनाच्या पातळीवर तत्काळ पावले उचलण्याची परंपरा त्यांनी कायम राखली आहे.
९ ऑक्टोबर रोजी नवा अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांमधील २५३ तालुक्यांतील शेतकऱ्यांना यानुसार मदत दिली जाणार आहे. खरीप हंगाम जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, घरातील साहित्याचे नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. यासाठी नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाणार आहे.
शासनादेशात मुल तालुक्याचा समावेश होणार असून, मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. मुल तालुक्याला त्यांच्या हक्काची ही मदत प्रत्यक्षात पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-----------------
मुल येथील रेल्वे उड्डाणपुलास ३१ कोटींची मंजुरी .!
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी दिला शब्द केला पूर्ण .. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश .!
चंद्रपूर : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे. ‘दिला शब्द केला पूर्ण’ या भावनेने लोकांना दिलेला शब्द पाळत आ. मुनगंटीवार यांनी मुल शहरासाठी आणखी एक महत्त्वाचा विकासाचा टप्पा गाठला आहे.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून मुल शहरालगत रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास अखेर मंजुरी मिळाली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) दीपक कुमार गुप्ता यांनी याबाबत अधिकृत पत्राद्वारे आमदार श्री.मुनगंटीवार यांना मंजुरीची माहिती दिली आहे.मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ९३० वरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. GCF १२३ येथे उड्डाणपुलाच्या मंजुरीबाबत डीआरएम दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांनी पत्राद्वारे अधिकृत कळविले आहे.
या ठिकाणी अवजड वाहने आणि इतर वाहतुकीमुळे वारंवार अडथळे निर्माण होत होते. नागरिकांनी यासंदर्भात आ.मुनगंटीवार यांना अवगत केले. या मागणीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
आपल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार मुनगंटीवार म्हणाले,विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा मनस्वी आनंद आहे. हा उड्डाणपूल केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणार नाही, तर मुल शहर आणि परिसराच्या सौंदर्यातही भर घालणार आहे. या पुलामुळे शेती, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल.”
