झाड झडूले शस्त्र बनेंगे
भक्त बनेगी सेना
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे
नाव लगेगी किनारे
वंदनीय राष्ट्रसंतांचे भजन ऐकून अंगावर राष्ट्रीयत्वाचे शहारे येतात आणि विचारांची धावपळ सुरू होते अशा ग्रामगीतेतील अध्यायांच्या ओव्यामधून क्रांतीदर्शीत्व विचार म्हणजे काय हे प्रा.डॉ. ज्ञानेश हटवार यांनी " ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्व " या पुस्तकामधून विस्तृतपणे विशद केलेले आहे.
गावागावासी जागवा, भेदभाव समुळ मिटवा उजळा ग्राह्मोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे
अशा ललकारीने सुरुवात करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समस्त मानव जातीच्या कल्याणाकरिता समाज प्रबोधन, संस्कृती संवर्धन,विचार मंथन आणि 'वसुधैव कुटुंबकम' ही विश्वकल्याणाची वैश्विक भावना आपल्या क्रांतीदर्शित्व विचारातून मांडलेली आहे.
राष्ट्रसंतांच्या कर्तुत्वाचा धागा घेऊन लेखक डॉ. ज्ञानेश हटवार यांनी एकूण पाच प्रकरणांमध्ये ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्व विचार मांडलेले आहे.
पहिल्या प्रकरणांमध्ये ग्रामगीतेतील समाज-परिवर्तन, दुसऱ्या प्रकरणांमध्ये राष्ट्रसंतांचे ग्रामराज्य, तिसऱ्या प्रकरणांमध्ये एकेश्वरवाद आणि आत्मशुद्धी, चौथ्या प्रकरणात स्त्री कर्तृत्वाचे महात्म्य आणि पाचव्या प्रकरणात राष्ट्रोद्धारासाठी शिक्षण असे महत्त्वपूर्ण आशयसंपन्न ग्रामगीतेतील अध्यायांच्या ओव्यामधून संपूर्ण ग्रामगीतेतील सर्वांग क्रांतीदर्शित्व अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने ओघवत्या भाषेत मांडताना मांडताना म्हणतात....
आपुली साधावी उन्नती
सौख्य द्यावी इतरांप्रती
या उद्देश जी जी संस्कृती
धर्म म्हणावे तीजलागी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. रवीन्द्र शोभने सर यांनी 'ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्व' ग्रंथाची पाठराखण करून ग्रंथाचे मोल वाढविले आहे.
मानवाचा माणुसकी हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कृष्टरोग्यांच्या सेवेतून माणुसकीचा धर्म जोपासणाऱ्या बाबा आमटे यांच्या आनंदवनातील महारोगी सेवा समितीचे सचिव आदरणीय डॉ.विकास आमटे साहेब यांनी प्रस्तुत ग्रंथाला दिलेल्या आत्मीय स्नेहबंधाच्या शुभेच्छा अनमोल आहेत. कारण महाराष्ट्र ही संतांची... योद्ध्यांची... क्रांतिकारकांची... साहित्यिकांची आणि नरपूंगवांची जन्मभूमी असून प्रखर देशप्रेमाने तावून-सुलाखून निघालेल्या देशभक्तांच्या मांदियाळीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थान सदैव अग्रभागी होते असे त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले आहे.
ग्रामगीतेतील क्रांतीदर्शीत्व हा ग्रंथ जन्माला यावा याचे मूळ कारण म्हणजे या ग्रंथाला लाभलेली लाखमोलाची प्रस्तावना लिहिणारे आदरणीय जेष्ठ साहित्यिक,रंगकर्मी आणि विचारवंत प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर सर हे होय.
ग्राम हा विश्वाचा नकाशा
गावावरून देशाची परीक्षा
गावची भंगता अवदशा
येईल देशा
हे जगण्याचे सूत्र घेऊन आदरणीय प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर सर यांच्या मार्गदर्शनात डॉ. ज्ञानेश हटवार यांनी मांडलेले ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्व विचार तुम्हा- आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन नवीन पिढीला आशादायी नवचैतन्याने भरलेल्या नवसमाजाची निर्मिती करण्यात नक्कीच मोलाची कामगिरी बजावणार आहे यात मुळीच शंका नाही.
व्यक्ती व्हावे कुटुंब पूरक ,
कुटुंब व्हावे समाज पोषक
तैसेची ग्राम व्हावे राष्ट्र सहाय्यक
राष्ट्र विश्वशांतीदायी
सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्र प्रेमाची जोड देणारे संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्वाच्या पहिल्या प्रकरणात समाज परिवर्तनाबद्दल विचार मांडताना लेखक म्हणतात सामाजिक व धार्मिक उत्सवांमधून देशसेवा घडली पाहिजे, करमणुकीसाठी उत्सव हे देशाचे नुकसान आहे.
कष्ट करोनी धन जोडावे
ते धन सत्कारनीच लावावे
कधीही निरर्थक न वेचावे
छंदी कुणाच्या लागुनी
निकोप कुटुंब व्यवस्था बद्दल बोलताना मानवी जीवनातील गवतरुपी दुर्गुण समूळ उपटून टाकून चांगल्या संस्काराच्या आम्रवृक्ष समाजात भरावा अशी अपेक्षा करताना राष्ट्रसंत म्हणतात..
दारू, गांजा, भांग, अफीम
जुगार, वेश्यादी वाईट काम
यांचे उरू न द्यावे नाम
आपुल्या गावी
म्हणजेच युवकांनी मादक द्रव्य सेवनाच्या आहारी न जाता व समाज विघातक वाईट वासनांध कृत्याच्या मागे न लागता पुरुषार्थ गाजवावा असे राष्ट्रसंतांचे विचार प्रखरपणे मांडलेले आहे.
याचबरोबर गोमातेचे दिव्यत्व, कृषी विषयक दृष्टिकोन , वर्णव्यवस्था आणि आदर्श विवाह पद्धती अशा समाज परिवर्तन घटकांमधून राष्ट्रसंतांनी फार मोठी वैचारिक क्रांती केलेली दिसून येते.
ना जाती होती नीच है
ना निच होते कर्म ही
सत्कर्म किसी से भी रहे
है पात्र आदर का वही
दुसऱ्या प्रकरणात लेखकांनी राष्ट्रसंतांचे ग्रामराज्य विशद करून ग्राम हा विश्वाचा मूळ घटक असून जगात भारत देशाची ओळख कृषीप्रधान व खेड्यांचा देश म्हणून आहे. ग्राम म्हणजे खेडे हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचा प्राणसदृश्य अति महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्याच्या सर्वांगीण कल्याणाची अहरनिश तळमळ महाराजांना लागलेली होती. राष्ट्रसंत म्हणतात
व्यक्तीधर्म ,कुटुंबधर्म
समाजधर्म ,गावधर्म
बळकट होई राष्ट्रधर्म
प्रगतीपथाचा
अशाप्रकारे स्वावलंबनाचे महत्त्व ,आदर्श ग्रामरचना ,ग्रामसफाई ,सामुदायिक जीवन, गरीब-श्रीमंत वाद व त्यावर उपाय आणि ग्रामोद्योगातून ग्रामविकास हे लेखक डॉ.ज्ञानेश हटवार यांनी राष्ट्रसंतांच्या मर्मभेदी विभिन्न ओव्यांमधून विस्तृत विवेचनाद्वारे पटवून दिलेले आहे.
श्रमनिष्ठेचा करावा प्रचार
सर्वांस आपुलकी वाटे पुरेपूर
ऐसी व्यवस्था करावी सुंदर
गावचे उत्पादन वाढवोनी
ग्रामगीतेतील क्रांती दर्शत्वाच्या तिसऱ्या प्रकरणात लेखक डॉक्टर ज्ञानेश हटवार यांनी एकेश्वरवाद आणि आत्मशुद्धी यावर संशोधनात्मक दृष्टिकोनातून मानवी जीवनाच्या अंतर्भाह्य घटकांवर आपण पंचतत्वाचे कसे स्वरूप आहोत म्हणून जगत कल्याणासाठी आपले कार्य काय आहे हे ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ डीपीकेच्या सुरुवातीला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेध या आत्मरूपा असे स्व चे दर्शन घडविले त्याचप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या द्वारे एकेश्वरवाद व आत्मशुद्धीचे दर्शन घडविले आहे.जसे...
ओम नमोजी विश्वचालका
जगदवंद्ध्या ब्रम्हांडनायका
एकची असोनी अनेका
भासशी विश्वरूपी ...
म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व चराचरात जळीं, स्थळी ,काष्टी , पाषाणी सर्वत्रच आहे , तेव्हा आपण त्या परमेश्वराचे श्रद्धेप्रमाणे वेगवेगळ्या नावाने स्मरण करतो.
राष्ट्रसंत म्हणतात ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचे नामस्मरण करा आणि त्यांना गुरुस्थानी माना. मग ते गौतमबुद्ध, श्रीराम, येशू ख्रिस्त, अल्ला कोणीही असो.
कारण मनुष्य आपल्या ध्येयाला नामस्मरणाने जेव्हा समर्पित होतो तेव्हा विषय-वासना नामस्मरणात विलीन होतात असे ग्रामगीतेतील क्रांतीदर्शीत्व विचार लेखक डॉ.ज्ञानेश हटवार यांनी अत्यंत मार्मिकपणे पटवून दिले आहे.
ग्रामगीतेतील क्रांतीदर्शत्वाच्या चौथ्या प्रकरणात लेखक महिलोन्नतीच्या अध्यायाद्वारे कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा पाया असणाऱ्या महिलांबद्दल चिंतन व मनन केलेले आहे.
स्त्रियांबद्दल राष्ट्रसंतांचा दृष्टिकोन जेवढा आधुनिक तेवढाच आदर्शाचा पूजकही आहे. राष्ट्रसंत म्हणतात ...
काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद
काय नाही केला ब्रह्मवाद
ना ना विद्या कला वेद
यात प्रवीण कितीतरी
किंवा
काय स्त्रियांनी युद्ध नाही केले
पती पुत्रा नाही प्रोत्साहन दिले
काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले
ब्रीदासाठी...
म्हणजेच मंदोदरी, सीता, सावित्री, द्रोपदी यांच्यासारख्या साध्वी स्त्रियांनी प्रपंचातही परमार्थ साधला व त्याचप्रमाणे गॉर्गी, मैत्री यासारख्या ब्रह्मवादिनी स्त्रियांनी बुद्धीचातुर्यातही चुणूक दाखविली आहे.
एवढेच नाही तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी पद्मिनी ,राणी दुर्गावती व राजमाता जिजाऊ यांनी आपल्या वीर प्रवृत्तीच्या पुरुषार्थाचा परिचय जगाला दाखवून दिला आहे व नंतरच्या काळात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलून समाजाच्या विरोधाला न जुमानता स्त्रियांना शिक्षित केले यातून स्त्री कर्तुत्वाचे महात्म्य ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्वात लेखक डॉ ज्ञानेश हटवार यांनी चपखलपणे मांडलेले आहे. सोबतच मातृप्रेमाचा गौरव करताना लिहितात ...
देवाने निर्मिली ही क्षिती
तिचे उदरी खाणी किती
परि माऊली जैसी प्रेमळ दीप्ती
कोठेच नाही
म्हणूनच की काय लेखक डॉ.ज्ञानेश हटवार यांनी आपले प्रथम ग्रंथाचे पुष्प त्यांच्या मातोश्री स्वर्गीय अन्नपूर्णा दयारामजी हटवार यांच्या पावन स्मृतीस अर्पण केलेले आहे. आणि पुस्तकाचे सर्वाधिकार त्यांच्या सुविध्य पत्नी सौ केशनी ज्ञानेश हटवार यांच्याकडे अबाधित केले आहे यावरून लेखकाची स्त्रीविषयक भूमिका दिसून येते.
लेखकांनी ग्रामगीतेमधले आत्मसाक्षात्काराबद्दल असणारे अनेक दाखले देऊन स्वतःला कसे ओळखावे हे पटवून दिले आहे. स्वतःला ओळखताना देहाच्या पलीकडे असणारा मी कोण आहे हे शिक्षणाशिवाय कळणार नाही कारण शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास म्हणून शिक्षण हे राष्ट्रोध्दारासाठी असले पाहिजे असे लेखक डॉ.ज्ञानेश हटवार पाचव्या प्रकरणात राष्ट्रोद्धारासाठी शिक्षणाबद्दल लिहिताना म्हणतात की,
जीवन व शिक्षण यांचा अनन्यसाधारण संबंध आहे.
वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या आश्रमात बालसदन,बालक मंदिर, विद्यामंदिर, अध्यापक विद्यालय ,वस्तीगृह यासारखी केंद्रे बनविली आहेत. कारण राष्ट्रसंतांना बालकांमध्येच राष्ट्राचे भवितव्य दिसत होते. जसे..
या कोवळ्या कड्यामाजी
लपले ज्ञानेश्वर,रवींद्र ,शिवाजी
विकसता प्रगटतील समाजी
शेकडो महापुरुष
हे ग्रामगीतेतील क्रांतीदर्शीत्व विचार प्रत्येक नागरिक सुशिक्षित ,सुजाण आणि स्वावलंबी होण्यास मदत करणारे आहे असे स्पष्टपणे दिसून येते.
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा शांतचित्ताने प्रतिकार करण्याची भावना म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान होय.
आपणासी वाटे जैसे गाव व्हावे
तैसेची बालकांना शिकवावे
शहाणे करूनी सोडावे
विद्याशिक्षणे सर्वची
आपली मुले हेच खऱ्या अर्थाने गावाचे व राष्ट्राचे धन आहे म्हणून त्यांच्यावर सुसंस्कार करून त्यांना चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व घडवायला लावावे हे ग्रामगीतेतील क्रांतीदर्शीत्व विचार लेखक सांगायला विसरत नाही.
तसेच शिक्षण हे मानवाला जीवनाभिमुख व सम प्रतिष्ठा जोपासणारे असावयास हवे.
जसे ..
नुसते नको उच्च शिक्षण
हे तो गेले मागील युगी लपोन
आता व्हावा कष्टीक,बलवान
सुपुत्र भारताचा
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून देशाला जागविण्याची प्रेरणा समाजाला दिली. आज त्या विचारांचा अंगीकार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय लोकशाही फलदायी व यशस्वी होण्यासाठी राष्ट्रसंतांनी दिलेले विचार आजही तेवढेच प्रेरणादायी आहे हे लेखक डॉ. ज्ञानेश हटवार आपल्या ग्रामगीतेतील क्रांतीदर्शीत्व या नूतन पुस्तकाच्या माध्यमातून पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
कर्मकांडाने कोणताही देव प्रसन्न होत नाही तर प्रामाणिक माणसाला आपल्या कामातूनच देवाचे दर्शन घडते, म्हणून हा ग्रंथ आबाल वृद्धांसाठी मार्गदर्शक ठरेल यात मला शंका नाही. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने कर्ममय भक्ती द्वारे आपल्या आयुष्याचे सोने करावे हा या ग्रंथाचा सार मला भावला.
आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला असला तरी महात्मा गांधींनी 1942 ला " चले जाव "ची घोषणा करून केलेले आंदोलन वंदनीय राष्ट्रसंतांनी एवढे मनावर घेतले होते की चिमूर मध्ये भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी युवकाच्या सोबतीने ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन केले आणि 16 ऑगस्ट 1942 ला चिमूर तीन दिवसासाठी ब्रिटिशांच्या राज्यातून मुक्त करून आपला तिरंगा ध्वज फडकविला होता व संपूर्ण भारतात चिमूर शहर तीन दिवस स्वतंत्र झाले होते अशी माहिती बर्लिनच्या रेडिओ स्टेशन वरून वीर स्वातंत्र्यसेनानी सुभाष चंद्र बोस यांनी ही बातमी प्रसिद्ध केली होती. हेच ग्रामगीतेतील मूळ क्रांतीदर्शित्वाचे सूत्र आहे.
माझे मित्र लेखक डॉ. ज्ञानेश हटवार यांनी अत्यंत चिकित्सकपणे ग्रामगीतेतील क्रांती दर्शित्व विचार आपणा सर्वांसमोर सोप्या-सुलभ आशयसंपन्न भाषेत मांडून एक नवीन साहित्यिक खजाना उपलब्ध करून दिलेला आहे. तेव्हा आपण सर्वजण या नवीन ग्रंथाचे स्वागत करूया...!!
राष्ट्रसंतांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक संशोधकास प्रस्तुत ग्रंथ अत्यंत मोलाचा व मार्गदर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त करतो.
"ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्व" या नूतन ग्रंथास माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
