बल्लारपुर (का.प्र.) - शिक्षकांनीच विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे उघडीस येत असून चंद्रपूर शहरातील एका नावाजलेल्या शाळेत वारंवार हा प्रकार समोर येत असल्यामुळे शाळा तसेच शिक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चंद्रपूर शहरातील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल विद्यार्थिनींचा विनयभंग तसेच अन्य कारणांसाठी सतत वादात राहात असते. नुकत्याच उघडकीस आलेल्या घटनेमध्ये इयत्ता दहावीतील दोन विद्यार्थिनींचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अभिजीत रागीट या शिक्षकाला गुरुवारी पहाटे पोक्सो अंतर्गत अटक केली आहे.
भवानजीभाई चव्हाण शाळेच्या दोन शिक्षकांनी वर्षभरापूर्वी एका वसतिगृहात राहात असलेल्या शाळेच्याच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला आहे. अभिजीत रागीट हा शिक्षक इयत्ता दहावीला शिकवितो. विद्यार्थिनींना धमकी देवून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.खेडेगावातून शिक्षणासाठी आलेल्या दोन आदिवासी विद्यार्थिनींनी शिक्षकाचा हा जाच आणखी किती दिवस सहन करायचा म्हणून आपबिती पालकांना सांगितली. पालकांच्या तक्रारीवरून दोन्ही विद्यार्थिनींनी बुधवारी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून अभिजीत रागीटविरुद्ध पोक्सो तसेच अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. त्याच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांमुळे त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले नाही, असे रामनगर पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.