भद्रावती नगरपरिषद येथील प्रकार, प्रशासनाचे दुर्लक्ष.!
भद्रावती (ता.प्र.) - स्वच्छ, सुंदर, हिरवेगार भद्रावती करण्याकरिता रस्ता रुंद करून रस्ता दुभाजकाची काम झालेले आहे. या दुभाजकामध्ये माती घालण्या ऐवजी चक्क ॲश घातली जात आहे. या कामाकडे नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.नुकतेच नगर परिषद भद्रावती ने स्वच्छ नगर परिषद म्हणून राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. नगरसेवक कुटेमाटे यांच्या घरापासून रेल्वे स्टेशन पर्यंत मागच्या वर्षी रस्ता दुभाजकाचे काम करण्यात आले. या दुभाजका मध्ये माती टाकून झाडे लावण्याची योजना झालेली आहे. स्वच्छ व हिरवेगार सुंदर भद्रावती नगरी असावी म्हणून लाखो रुपये भद्रावती नगरपरिषद खर्च करत आहे. मागच्या वर्षी झालेल्या रस्ता दुभाजकाच्या कामात यावर्षी त्या ठिकाणी माती टाकण्याऐवजी चक्क ॲश टाकली जात आहे.
किशोर रंगारी यांचे घराजवळ काल ॲश टाकल्या गेली , तेव्हा परिसरातील नागरिकांना वाटले की रस्त्यात पडलेले खड्डे बुजवले जाणार. पण सकाळी वेगळेच चित्र पहायला मिळाल्याने नागरिक आश्चर्यचकीत झाले. रस्ता दुभाजका मध्ये माती ऐवजी ॲश टाकण्यात येत असल्याचे लक्षात आले. ॲश टाकल्या मुळे तिथे झाडे जगतील का? स्वच्छ व सुंदर भद्रावती नगरी होईल का? असा प्रश्न नागरिक करत आहेत. नगर परिषदेत आधी योजना तयार करून कामे केली जातात. या रस्ता दुभाजकात माती घालून झाडे लावण्याचे नियोजन करून , तसा कामाचा कंत्राट झालेला असतांना या कामात तिथे माती टाकण्याऐवजी मात्र चक्क ॲश टाकला जात आहे. या कामात नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. या ठेकेदाराला काळ्या यादी मध्ये नगरपरिषद टाकेल का? त्याचे बिल थांबवून त्या ठेकेदारावर कारवाही करेल काय? असेही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होता आहेत. तेव्हा नगरपरिषद प्रशासनाने त्वरित या ठिकाणीचे काम थांबवून ॲश ऐवजी मातीच टाकली जावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.